युवा टेनिसपटू घडविण्यासाठी सानिया सज्ज

हैदराबाद: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आता देशासाठी युवा टेनिसपटू घडविण्यासाठी कंबर कसली आहे. सानियाच्या टेनिस अकादमीच्या उभारणीचे काम शहराच्या नजीक वेगाने सुरु असून पुढील वर्षाच्या मार्च महिन्यात ही अकादमी सुरू होण्याची शक्यता आहे.

एकूण चार एकर परिसरात उभ्या रहात असलेल्या या अकादमीत सुरुवातीला ९ हार्ड कोर्ट असतील. कालांतराने आणखी ९ हार्ड कोर्ट आणि ३ क्ले कोर्ट वाढविण्यात येतील; असे सानियाने पत्रकारांना सांगितले.

आपण आणखी काळ टेनिस खेळू शकू. मात्र देशासाठी खेळाडू घडविण्याचे कार्य आपण दीर्घ काळ करीत राहू; अशी ग्वाही सानियाने दिली. या अकादमीतून प्रशिक्षित झालेले खेळाडू आणखी १० वर्षानंतर देशासाठी खेळताना दिसतील; असा विश्वास तिने व्यक्त केला. आपल्या अनुभावाचा पुरेपूर फायदा आपण आपल्या प्रशिक्षणार्थी खेळाडूंना करून देऊ आणि परिपूर्ण टेनिसपटू घडवू; असेही सानिया म्हणाली.

प्रशिक्षणाच्या आंतराराष्ट्रीय पातळीवरील सर्व सुविधा या अकादमीत किफायतशीर दरात उपलब्ध करून देणार असल्याचेही सानियाने सांगितले.

Leave a Comment