ओस्लो: संपूर्ण युरोप खंडाला एकत्र करून सदस्य देशात स्थिरता निर्माण करण्याचे महत्वपूर्ण कार्य केल्याबद्दल युरोपियन युनिअनला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. मंदीच्या खाईत अडकलेल्या युरोपला त्यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या युरोपियन युनियनचे मनोबल या पुरस्काराने उंचावणार आहे.
युद्धाचा खंड ही युरोप खंडाची ओळख पुसून शांततेचे पर्व सुरू करण्याचे महत्वपूर्ण कार्य युरोपियन युनिअनने केले आहे; अशा शब्दात नोबेल समितीचे अध्यक्ष थोर्बजोन जॅगलँड यांनी युनिअनच्या कामाचे कौतुक केले. युरोपने आजपर्यंत जे काही प्राप्त केले आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावे; अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या युरोपची नव्याने उभारणी करण्यासाठी आणि १९८९ मध्ये बर्लिनची भिंत पडल्यानंतर एकूणच युरोपला स्थिरता प्रदान करण्यासाठी युनियनने उल्लेखनीय कार्य केल्याचेही त्यांनी नमूद केले.
ओस्लो येथे दि. १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात युरोपियन युनियनला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.