एअर इंडिया बिल्डींगची बिल्डरला विक्री ?

मुंबई दि.१३- राजकारणातील कांही व्यक्ती आणि विमान उद्योगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नरिमन पॉइंटवरील देशातले पहिले सेंट्रल बिझिनेस सेंटर म्हणून ओळखली जात असलेली एअर इंडिया बिल्डींग रियल इस्टेट व्यावसायिकाला विकण्यात येत असल्याचे समजते. हे २३ मजली कार्पोरेट हेडक्वार्टर राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाला लिजवर देण्यात आले होते. दोन लाख चौ.फूट जागा असलेली ही इमारत मरिन ड्राईव्हवरील ट्रायटेंड हॉटेलला लागूनच आहे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अशी अनेक महत्त्वाची कार्यालये मुंबईत आहेत. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने मुंबईचे महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीने सुरवातीपासून मुंबईतच असलेली ही महत्त्वाची कार्यालये दिल्लीला हलविण्याचा घाट घातला आहे. कारण ही इमारत विकण्याचा प्रस्ताव खुद्द विमान वाहतूक मंत्री अजित सिंग यांनीच मांडला आहे.

महाराष्ट्र विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनीही ही इमारत विकली जात असल्याच्या बातमीस दुजोरा दिला असून मुंबईत सध्या जागांचे दर पाहता यातून सरकारला प्रचंड फायदा होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की सत्तेची सारी केंद्रे मुंबईतून दिल्लीत हलविण्याचा कट रचला जात असून त्यात पहिला बळी एअर इंडिया बिल्डींगचा दिला जात आहे. अर्थात या व्यवहाराला विरोधी पक्ष कडाडून विरोध करणार असून हा व्यवहार होऊ दिला जाणार नाही असेही ते म्हणाले.

 

Leave a Comment