महाराष्ट्रात झंझावात

१९९५ साली महाराष्ट्रात काँग्रेसला पराभूत करून युतीची सत्ता आणण्यास कारणीभूत ठरलेले भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे आता महाराष्ट्रात २०१४ साली होणार्‍या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. युतीसाठी ही येत्या निवडणुकीत जमेची बाजू ठरणार आहे.  पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तसे अधिकृत रीत्या जाहीर केले आहे. मुंडे महाराष्ट्रात येणार म्हणजे दिल्ली सोडून येणार की, दिल्लीतले आपले स्थान टिकवून येणार असा प्रश्न आहे. त्यांचे महाराष्ट्रात आगमन भाजपासाठी  जरूरीचे आहे. महाराष्ट्रात त्यांच्याइतके प्रभावी राजकारण करणारा नेता भाजपातही नाही आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतही नाही. 

या गोष्टी खर्‍याच आहेत पण त्यांना महाराष्ट्रात येताना दिल्लीतही काही भूमिका कायम ठेवलेली आहे का असा प्रश्न येणारच आहे. ते स्वतःहून दिल्लीतल्या राजकारणाचा नाद सोडून महाराष्ट्रात परत येत असतील तर तो वेगळा चर्चेचा विषय ठरणार आहे. आता तरी ते कसेही येवोत त्यांच्या आगमनाने महाराष्ट्र भाजपात जान येणार आहे हे नाकारता येत नाही. त्यांचे हे आगमन काही लोकांना आवडणार नाही. काही लोकांना ते नको आहेत पण असे लोक पक्षात फार कमी आहेत. आणि मुंडे नकोत तर मग त्यांना पर्याय कोण याचे त्यांच्याकडे काहीही उत्तर नाही.

त्यामुळे त्यांच्या या नाराजीकडे दुर्लक्षच करणे भाजपासाठी हिताचे ठरणार आहे. मुंडे यांची दिल्लीतले राजकारण सोडण्याची तयारी झाली आहे का हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे कारण त्यावरून आता महाराष्ट्रातले काही राजकीय निरीक्षक काही विश्लेषण मांडायला लागले आहेत. मुंडेंचा विषय निघाला की त्यांच्यावर होत असलेल्या कथित अन्यायाची चर्चा होते. मग उमा भारती, कल्याणसिंग, बाबूलाल मारंडी, येडीयुरप्पा यांचेही संदर्भ दिले जातात. हे सर्व नेते ओबीसी आणि तत्सम जातींचे आहेत. त्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यात भाजपाला मोठे केले पण त्यांची पक्षाला गरज उरली नाही की त्यांना पक्षाने दूर केले, भाजपात असे ओबीसी नेत्यांना पक्ष मोठा करण्यासाठी वापरले जाते आणि ज्यांच्या जीवावर पक्ष मोठा होतो त्या ओबीसी नेत्यांनाच पक्षातले काही उच्चवर्णीय नेते नंतर कस्पटासमान लेखायला लागतात.  असे विश्लेषण ही राजकीय निरीक्षक मंडळी मांडायला लागतात. त्यातून त्यांना भारतीय जनता पार्टीची शेटजी – भटजींचा पक्ष अशी प्रतिमा कायम करायची असते. ही मंडळी पक्ष मोठा करू शकत नाहीत पण पक्ष मोठा करणारांना त्यांची किंमतही देत नाहीत असा आरोप या निरीक्षकांना करायचा असतो.

मुळात या नेत्यांना पक्षाने मोठे केले की त्यांनी पक्षाला मोठे केले हा विषय फार गहन आहे. कल्याणसिंग आणि उमा भारती यांचेच उदाहरण देण्यासारखे आहे. या लोकांनी पक्षाला मोठे केले असते तर त्यांच्या जाण्याने भाजपा पक्ष त्या त्या राज्यातून संपायला हवा होता आणि ते पुन्हा पक्षात आले तेव्हा पक्षाला पुन्हा जीवदान मिळायला हवे होते. पण तसे झालेले नाही. उमा भारती पक्षात असताना त्यांनी पक्षाला विजय मिळवून दिला. हा विजय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा होताच पण पक्षाचाही होता. पण त्याचे श्रेय त्यांना दिले जाते. तसे असेल तर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले तेव्हा पक्ष संपायला हवा होता.  पण तसे झालेले नाही. त्यांच्या पश्चातही पक्षाला पुन्हा बहुमत मिळाले आहे. 

त्या एवढ्या मोठ्या होत्या तर पक्षाला पुन्हा सत्ता मिळायला नको होती. शिवाय त्या मोठ्या आहेत तर त्यांनी पक्षातून बाहेर पडल्यानंतर जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाला सत्ता मिळायला हवी होती. पण त्यांना तो पक्षही वर्षभर चालवता आला नाही. पक्षाला नेता लागतो ही गोष्ट खरी. नेतृत्व, संघटना, जनतेचा आधार आणि पक्षाची प्रतिमा या सर्व घटकांचा राजकारणावर परिणाम होत असतो. केवळ नेता आहे म्हणून पक्ष नसतो. नेत्याचे व्यक्तिमत्त्व उपयोगी असतेच पण म्हणून तो पक्षापेक्षा मोठा ठरत नसतो.

वर उदाहरण दिलेल्या सर्व नेत्यांनी पक्षाला यश मिळवून दिले पण ते स्वतःला पक्षापेक्षा मोठे समजायला लागले. येडीयुरप्पा यांना कल्याणसिंग यांचे उदाहरण समोर दिसत असतानाही ते अजून स्वतःला पक्षाचा आधार समजण्याची चूक करीत आहेत. मुंडे हे महाराष्ट्रात भाजपाला पुढे नेऊ शकतात. पण त्यांनाही आपला प्रत्येक शब्द प्रमाण मानला पाहिजे असे  वाटते. आता त्यांना महाराष्ट्रात आणले जात आहे हे त्यांचे खच्चीकरण नाही. त्यांनी स्वतःच केन्द्रीय राजकारणात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिथे आपण फार प्रभाव पाडू शकत नाही हे त्यांनाच लक्षात येत आहे आणि आता ते स्वतःहूनच महाराष्ट्रात येत आहेत. त्यांच्या या केंद्रात जाण्याचे आणि महाराष्ट्रात परतण्याचे उगाच जातीयवादी अन्वयार्थ लावण्यात काही तथ्य नाही. 

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीने राज्याला किती अवनतील आणून ठेवले आहे हे आपण पहातच आहोत. अशा अवस्थेत महाराष्ट्राला  आणखी अधःपतनापासून वाचवायचे असेल तर भक्कम नेता हवा आहे. असा नेता आता तरी मुंडे यांच्याशिवाय कोणीही नाही. तेव्हा सर्वांनी त्यांचे स्वागतच करायला हवे.

 

Leave a Comment