प्रदीप रायसोनी यांचा जामीन नाकारला

जळगाव: महापालिकेतील घरकुल घोटाळा प्रकरणातील आरोपी प्रदीप रायसोनी यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. गुन्हाचे गांभीर्य आणि आरोपींचा पूर्वेतिहास सरकार पक्षाने निदर्शनास आणून दिल्यानंतर खंडपीठाने जामीन नाकारला.

घरकुल घोटाळ्यातील आरोपी रायसोनी यांनी केलेल्या जामीन अर्जावर मुख्य न्यायमूर्ती अल्तामाश कबीर, न्या. चल्लमेश्वर आणि न्या. निज्जर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

रायसोनी हे घरकुल घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असून आरोपींमध्ये १० ते १२ प्रभावशाली व्यक्तींचा समावेश आहे. या आरोपींनी सन २००६ पासून सातत्याने दबावतंत्राचा वापर केला आहे. मूळ फिर्यादी डॉ. प्रवीण गेडाम यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, या गुन्ह्याचे तपासाधिकारी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांना भर न्यायालयात धमकी देणे, जिल्हा शल्य चिकित्सकांना मारहाण, जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणे अशी कृत्ये केली असल्याचे निदर्शनास आणत सरकार पक्षाने रायसोनी यांच्या या कटातील सहभागाचे गांभीर्य विदित केले.

दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून खंडपीठाने जामीन नाकारला.

Leave a Comment