पाकिस्तानातील ‘वनी’ पद्धत

pak

पाकिस्तानातील पुराणमतवादी लोकांचा समाजावर अजूनही पगडा असल्यामुळे तिथे मुलींना आपल्या पसंतीच्या तरुणाशी विवाह करणे कसे अशक्य होऊन बसते हे अलीकडच्या काळात दिसून आले आहे. एखाद्या मुलीने आपल्या आई-वडिलांच्या मर्जीच्या विरुद्ध विवाह केलाच तर तिच्यासाठी तो विवाह तिच्या जीवाचा धोका ठरतो. पण याच पाकिस्तानमध्ये मुली आणि विवाह यांच्या संबंधाने अजूनही आदि मानवाच्या काळातील प्रथा कशा पाळल्या जात आहेत हे लक्षात येते. असे एक प्रकरण नुकतेच पुढे आले आहे. 

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये अजूनही आदिवासी जमाती राहतात आणि त्यांचे रितीरिवाज हजारो वर्षांपासून आहेत तसेच आहेत. तिथे आता ‘वनी’ पद्धत रूढ आहे. ही वनी पद्धत काय आहे, याचा शोध घेतला असता असे लक्षात आले की, तिथल्या आदिवासींच्या टोळ्यांमधली ती एक देवाण-घेवाणीची रीत आहे. तिथे बुगटी जमात ही मोठी प्रभावी जमात समजली जाते आणि तिचे वास्तव्य मनसेहरा या भागात आहे. या भागातील बागीरानी आणि शहावानी या दोन जातींमध्ये वैमनस्य आहे. त्यातून बागीरानी जमातीच्या लोकांनी शहावानी जातीच्या एका व्यक्तीचा खून केला. असा खून झाल्यास आणि तो सिद्ध झाल्यास त्या खुनाचे प्रकरण मिटविण्याची वनी पद्धत त्या भागात रूढ आहे. या पद्धतीनुसार ज्या जमातीच्या लोकांनी खून केला असेल त्यांनी आपल्या जमातीच्या काही मुली ज्यांचा खून झाला असेल त्या जमातीच्या लोकांना देऊन टाकाव्या लागतात. 

अशा रितीने दिलेल्या मुली त्या जातीतल्या मुलांशी लग्न करू शकतात. त्यांनी कोणाशी लग्न करावे हे ठरविण्याचा अधिकार त्या मुलींना असतो. पण तरी सुद्धा तो विवाह आंतरजातीय असतो आणि पाकिस्तानात तरी अजून आंतरजातीय विवाह हे पाप मानले जाते. अशा रितीने खून करणार्‍या जमातीला त्यांच्यातील मुलींना आंतरजातीय विवाह करायला लावणे ही शिक्षा समजली जाते.

नुकत्याच एका प्रकरणामध्ये बागीरानी जातीच्या १३ मुली शहावानी जातीला दिल्या गेल्या. हा निवाडा बुगटी जात पंचायतीने केला. या घटनेचे पडसाद पाकिस्तानात उमटले आहे. अशा प्रकारची मुलींचा वापर करण्याची पद्धत पाकिस्तानात अजूनही रूढ आहे या कल्पनेने शहरातल्या लोकांना धक्का बसला. एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यानुसार न्यायालयाने आता या प्रकाराची चौकशी करण्याकरिता समिती नेमली आहे. 

 

Leave a Comment