क्रिकेटवरचा विश्वास उडेल

फार पूर्वी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दारासिंग आणि किगकाँग यांची फ्री स्टाईल कुस्ती लावली जात असे. त्यात मॅच फिक्सिंग झालेले असे पण कुस्ती बघायला हजारो लोक येत असत. लोकांना यातली बदमाषी लक्षात यायला लागल्यावर लोक येईनासे झाले आणि तो प्रकारच बंद झाला. तसा प्रकार क्रिकेटच्या बाबतीत होऊ नये असे वाटत असेल तर क्रिकेटच्या खेळाचे पावित्र्य राखले जायला पाहिजे. तसे होताना दिसत नाही. या खेळाची विश्वासार्हता  लयाला जाईल असे काही प्रकार घडत आहेत. या खेळात भरपूर पैसा मिळत आहे आणि त्यातून समृद्धी वाढून भ्रष्टाचार वाढायला लागला आहे.  

भारतात आयपीएलने पुरेपूर भ्रष्टाचार सुरू केला.  मुळात कसोटी पेक्षा एक दिवसीय सामने लोकप्रिय झाले आणि लोकप्रियतेसोबत त्यातला पैसा वाढायला लागताच जाईल तेथे पैसे खाण्याची सवय लागलेल्या लोकांनी या खेळात गैर मार्गाने करोडो रुपये कसे मिळवता येतील याचे मार्ग शोधले. त्यातूनच मॅच फिक्सिंग नावाचा अभद्र प्रकार निर्माण झाला. एखाद्या खेळाडूने ठरवून बाद व्हावे, एखाद्या गोलंदाजाने ठरवून वाईट गोलंदाजी करावी आणि त्यासाठी काही ठराविक पैसे घ्यावेत असे आतल्या आत संगनमत व्हायला लागले. त्यापायी काही खेळाडूंचे क्रिकेट करीयर वाया गेले पण त्यांनी करीयरपेक्षा पैशालाच अधिक महत्त्व दिलेले होते. आता मॅच फिक्सिंगमध्ये पंचही सहभागी होत असल्याचे दिसून आले आहे. 

श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या टी -२० चषक मालिकेत काही ठराविक संघाच्या बाजूने किवा विरोधात निर्णय देण्यासाठी काही पंचांनी पैसे मागितले आणि तसा संवाद सुरू असतानाच भारतातल्या  एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून या सहा पंचातला सारा संवाद आणि चित्रे यांची फीत तयार करून या पंचांना उघडे पाडले. या सहा जणात श्रीलंकेचे गामिनी दिस्सानायके, मौरीस विन्स्टन आणि सागरा गॅलागे हे तीन पंच समाविष्ट आहेत. पाकिस्तानचे नदीम घौरी आणि अनिस सिद्दिकी तसेच बांगला देशाचा नादीर शहा यांचा अंतर्भाव आहे. 

हे लोक कॅमेर्‍यात रंगेहाथ पकडले गेले असल्याने त्यांना इंटरनॅशनल क्रिकेट बोर्डाने तूर्त निलंबित केले आहे. त्यांच्या देशातल्या क्रिकेट नियामक बोर्डांनी त्यांची चौकशी करावी आणि ती पूर्ण होईपर्यंत या पंचांना कोणत्याही सामन्याचे पंच म्हणून पाचारण केले जाऊ नये असे आयसीसीने ठरवले आहे. या सहा जणांत काही पंच तर भरपूर अनुभवी आहेत. त्यांचे संवाद पकडले गेले आहेत. मात्र त्यातला एकही पंच नुकत्याच झालेल्या सामन्यांत प्रत्यक्षात पंच म्हणून कामावर नव्हता. त्यांनी  स्पर्धेंतल्या काही सराव सामन्यांत काम पाहिले होते. त्यांना पूर्वीचा अनुभव आहे पण त्यांनी आपल्या पंच म्हणून असलेल्या करीयरशी तडजोड केली आहे. 

यातल्या बांगला देशाच्या नादिर शहा यांनी काही पैशांच्या बदल्यात एखाद्या खेळाडूला बाद किवा नाबाद जाहीर करण्याचे कबूल केले होते. त्या पोटी त्याने ५० हजार रुपये मागितले होते. हा आकडा पाहिला म्हणजे या लोकांची किव येते. एका इंग्रजी दैनिकाने या विषयावर लिहिताना, पंचांना असा भ्रष्टाचार का करावासा वाटतो असा सवाल केला आहे. या लोकांना मानधन फार कमी मिळत असते म्हणून ते अशा मोहाला बळी पडतात असे या दैनिकाने म्हटले आहे. या नादिर शहाने केवळ ५० हजार रुपये लाच मागितली होती यावरून तो खरेच गरीब असेल असे वाटायला लागते. अशा फिक्सिंग मध्ये चौथा अंपायर फार मोलाचा असतो आणि त्याला फशी पाडण्यावर या प्रकरणात भर देण्यात आला होता असे लक्षात येते. कारण तो पकडला जात नाही. तो कोठेही कामात नसतो. तो कसलेही निर्णय देत नसतो. त्यामुळे बाद होणार्‍याला नाबाद आणि नाबाद असणार्‍याला बाद ठरवण्यात तो उपयोगी पडत नाही. त्याचा कोणाला संशयही येत नाही. पण तो कामगिरी मात्र मोलाची बजावू शकतो. एका अर्थी तो राखीव अंपायर असतो. 

तिघांपैकी एखादा अंपायर बाद झाला किवा कामावर आलाच नाही तरच या चौथ्याचा नंबर लागतो. शक्यतो तसे होत नाही आणि चौथा अंपायर कायम राखीवच राहतो. तसा तो रहात असला तरीही तो सामन्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्या अंतर्गत अधिकारी मंडळीत समाविष्ट असतो. या सर्वोच्च मंडळात खेळपट्टीची स्थिती, हवामानाचा अंदाज,  खेळणार्‍या संघाच्या सोळा मधून कोण खेळणार आहे याची चर्चा होते आणि ती माहिती याला असते. संभाव्य पंच म्हणून त्याला ती असावी लागते आणि या संबंधात निर्णय घेणार्‍या वर्तुळात त्याला घेतलेले असते. ही माहिती दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असते कारण तिच्या आधाराने कर्णधाराला आपले डावपेच ठरवता येत असतात. 

हा चौथा पंच ही माहिती काही पैशाच्या बदल्यात त्यातल्या कोणत्याही एका संघाला तो पुरवू शकतो. आताच्या प्रकरणात श्रीलंकेच्या सागरा गेलॅगे हा  चौथा अंपायर होता आणि तो ही सारी माहिती  कोणत्याही संघाला  पैशाच्या बदल्यात द्यायला तयार होता.  अशा रितीने पंचच पैसा घेऊन निर्णय द्यायला लागले तर संघाचे काय होईल आणि क्रिकेट खेळाचे काय होईल ? याचा त्यांनी विचार केलेला नाही.  

 

Leave a Comment