टोयोटो फॉल्टी गाड्या रिकॉल करणार

जगभरातील मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यातील एक टोयोटो कंपनीने त्यांच्या फॉल्टी पॉवर विंडो स्वीचमुळे जगभरातून ७४ लाख वाहने रिकॉल करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोषी स्वीच मुळे गाड्यांना आगी लागण्याच्या घटना घडल्या असून  त्याची दखल घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

कंपनीने ग्राहकांचा विश्वास कायम राखण्यासाठी हा निर्णय घेतला असला तरी त्यामुळे कंपनीच्या रेप्युटेशनला थोडाफार धक्का लागलेलाच आहे. २००८ पासून कंपनीची वाहने या ना त्या कारणाने अडचणीत येत आहेत. कंपनीचा हा सर्वात मोठा रिकॉल असून यापूर्वी फोर्डने १९९६ सालात इग्निशन डिफेक्टमुळे १ कोटी वाहने रिकॉल केली होती. टोयोटोला २००९ ते ११ या काळात १ कोटी वाहने रिकॉल करावी लागली आहेत.

जगातील सर्वोत्कृष्ट वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टोयोटोची जपानमधील भूकंप आणि त्सुनामी व थायलंड मधील पुरामुळे पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे ती अद्यापी पूर्ववत झालेली नाही. त्यातच फॉल्टी वाहनांची भर पडली आहे. यावर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने जगभरात ७८ लाख वाहने विक्रीचे उदिष्ट्य ठेवले होते मात्र चीनबरोबरच्या बेट खरेदी वादानंतर चीनमधील त्यांची विक्री एकदमच घसरली आहे. चीन हे टोयोटोसाठीची मोठी बाजारपेठ आहे. यंदा येथील विक्रीत ४८.९ टक्के घटच झाली असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

अमेरिकेत टोयोटोला फोर्ड आणि जनरल मोटर्सशी स्पर्धा करावी लागते आहे तर चीनमध्ये व्होक्सवॅगन, ह्युंडाई आणि निस्सान या कंपन्या त्यांच्या मुख्य स्पर्धक आहेत. कंपनीने रिकॉल केलेल्या वाहनांत मुख्यतः करोला आणि यारिस मॉडेल्स असून ही दुरूस्ती केवळ ४० मिनिटांत होऊ शकणार आहे असेही कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

 

Leave a Comment