नुकताच अधिक मास संपला आहे. भारतभरातल्या अनेक सास्वांनी आपल्या जावयांना अधिक मासाचे वाण आणि भरघोस आहेर केलेला आहे. तसा विचार केला तर सासूबाईकडून सातत्याने आहेर घेणे हा जावयांचा अधिकारच मानला जातो. परंतु अधिक मास संपल्या बरोबरच सोनिया गांधी यांना त्यांच्या जावयाने म्हणजे रॉबर्ट वद्रायांनी एक खासा आहेर केला आहे. सासूबाई गेल्या १०-१५ वर्षांपासून ज्या देशाची सूत्रे वाहत आहेत आणि ज्या सासूबाईंमुळेच हा देश टिकून राहिला आहे त्या सासूबाई म्हणजेच सोनिया गांधी यांचा हा देश म्हणजे बनाना रिपब्लिक झालेले आहे असे या जावयांनी म्हटले आहे. एका परीने भारत हे बनाना रिपब्लिक झालेले आहे. हा तसा जावई शोधच आहे. परंतु तो सासूबाईंच्या बाबतच असल्यामुळे या जावई शोधाकडे गांभिर्याने पहावे लागते.
रॉबर्ट वद्रायांनी आपल्या ट्विटरवर सध्याची अवस्था सांगताना बनाना रिपब्लिकमधील मँगो पीपल्स म्हणजे अरविंद केजरीवाल असे म्हटले आहे. त्यात पुन्हा आम आदमीचाही उध्दार केला आहे. रॉबर्ट वद्रायांना त्यांच्या अवैध संपत्तीचा गौप्यस्फोट झाल्यामुळे राग आला असेल. त्यांना असेही वाटत असेल की, एवढ्या आपल्या सासूबाई देशातल्या सर्वात सामर्थ्यशाली महिला आहेत. एवढेच नव्हे तर जगातल्या पहिल्या सर्वात सामर्थ्यशाली दहा महिलांमध्ये त्यांचा उल्लेख अमेरिकेतील मासिके करत असतात. भारतातील ग्रामपंचायतीचे सदस्य सुध्दा सत्तेचा आणि त्यातून आलेल्या सामर्थ्याचा आर्थिक वापर करत असतात. आणि जागोजाग असे पुंड पाळेगार श्रीमंत होताना दिसतात. मग आपण सर्वात सामर्थ्यशाली असलेल्या सासूबाईंचे जावई असूनही काहीच कमवत नाही हे काही खरे नाही. त्यातूनच दोन-तीनशे कोटी रुपये कमवले म्हणून बिघडले कुठे. एवढे तेवढे पैसे कमवले म्हणून अरविंद केजरीवालसारख्या फालतू माणसाने लगेच आपला पंचनामा करावा हे काय खरे आहे का? एवढे पैसे तर कुणीही कमावते. म्हणून रॉबर्ट वद्रायांना केजरीवाल यांचा राग आला. म्हणून त्यांनी वैताग व्यक्त केला.
एका फालतू देशातले फालतू लोक काहीतरी वटवट करतात आणि आपल्याला सामान्य माणसाच्या पातळीवर आणतात. हे काही खरे नाही. सगळाच फालतूपणा चाललेला आहे. वद्रा यांचा हा वैताग त्यांच्या ट्विटरवर प्रकट झाला.
बिचार्या या जावयाला काही लिखाण, वाचन करून माहीत आहे की हे काही कळत नाही. पण त्याच्या ट्विटरने नकळतपणे त्याच्या मनातली भाषा व्यक्त केली. सोनिया गांधी, रॉबर्ट वद्रा हे भारतातल्या एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधी आहेत. ते याच देशात राहतात. इथेच कमाई करतात. इथल्याच लोकांचे शोषण करून, सरकारच्या व्यवहारात हात बुडवून श्रीमंत होतात. परंतु एवढी कमाई करूनही ते याच देशाला फालतू समजतात आणि आपण या देशात जन्म घेतला किंवा काही निमित्ताने या देशाशी आपला संबंध आला. या आपले मोठे दुदैवच आहे असे मानून ते या देशाला शिव्या देत असतात. कधी कधी त्यांच्या कमाई मध्ये कोणाचा तरी अडथळा येतो किवा या देशातला एखादा आम आदमी त्यांच्या जवळ जातो त्यावेळेस ते अस्वस्थ होतात. आणि आपल्या नशिबाला बोल लावतात.
या देशातल्या आम आदमीच्या नावावर खोट्या घोषणा करून सत्ता काबीज करायला त्यांना लाज वाटत नाही. परंतु आम आदमी तर सोडूनच द्या पण त्यांचा तळागाळातला एखादा कार्यकर्ता त्यांच्या जवळ आला तरी त्यांना ते आवडत नाही. त्यांची मनमानी निर्वेधपणे सुरू असते आणि तिला कोणी हरकत घेतली की ते या देशाला बनाना रिपब्लिक म्हणून हिणवायला लागतात. रॉबर्ट वद्रा अशा वर्गाचा प्रतिनिधी आहे. म्हणून त्याच्या करोडोच्या संपत्तीला कोणी हरकत घेताच त्याला हा देश फालतू वाटायला लागला. नकळतपणे त्याची भावना ट्विटरवर व्यक्त झाली.
आपल्या ट्विटरवर आपली खरी भावना व्यक्त झाली आहे हे लक्षात येताच त्यांनी ती टिवटिव बंद करून टाकली. परंतु भावना काही लपून राहिली नाही. रॉबर्ट वद्रा याला भारत एक बनाना रिपब्लिक वाटत असेल तर त्याने हा देश असा का झाला आहे हे आपल्या सासूबाईंनाच विचारले पाहिजे. कारण निदान गेल्या दहा वर्षात तरी या देशाचे भवितव्य त्यांच्या या इटालियन सासूबाईच घडवत आहेत. मग सासूबाईने असे काय केले आहे की त्यामुळे या देशाची अंधेरनगरी झाली आहे? आपल्या जावयाचा अनोखा आहेर बघून सासूबाई तर दंगच झाल्या असतील. कारण सध्या त्यांना आपला देश तसा वाटत नाही. पूर्वी तो तसा वाटत होता. पूर्वी म्हणजे ७७ साली.
त्यावर्षी आणीबाणी उठून इंदिरा गांधींचा पराभव झाला होता आणि त्यांचे आता जनता राजवटीत काय होणार या प्रश्नाने त्यांच्या सूनबाई असलेल्या सोनिया गांधी अस्वस्थ झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी राजीव गांधी यांच्यामागे हा देश सोडून जाण्याचा तगादा लावला होता. त्यांच्या दृष्टीने त्यावेळी तरी हा देश इथे राहण्याच्या लायकीचा नव्हता. नंतर त्यांना कसलेही सामाजिक कार्य नसताना आणि कसलीही राजकीय जाण नसताना या देशामध्ये एवढी सत्ता मिळाली तेव्हा त्या देशभक्तीच्या गोष्टी बोलायला लागल्या. त्यांच्या जावयांना मात्र आता हा देश बनाना रिपब्लिक वाटत आहे.