रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई, दि. ५ – रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीवर शुक्रवारी झालेल्या मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमआरटीएच्या) बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंबईतील रिक्षाला तीन रुपये तर टॅक्सीला दोन रुपयाची भाडेवाढ देण्याचा निर्णय एमएमआरटीएने घेतला आहे. त्यामुळे रिक्षाला पहिल्या टप्प्यासाठी १२ रुपयांच्या मूळ भाड्यात तीन रुपयांची वाढ करून १५ रुपये एवढे केले, तर टॅक्सीच्या मूळ भाड्यात दोन रुपयाची वाढ करून ते १९ रुपये इतके केले आहे. ही भाडेवाढ ११ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. 

डॉ. हकीम समितीने रिक्षा-टॅक्सीचे भाडेदर सूत्र ठरवणारा अहवाल राज्य सरकारला सादर केला असून, काही दिवसांपूर्वी सरकारने तो स्वीकारला. या अहवालावर प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा करुन अखेर समितीच्या शिफारशीनुसार रिक्षाच्या किमान भाड्यात तीन रुपयांची भाडेवाढ देण्यात आली. तर टॅक्सीच्या किमान भाड्यात दोन रुपये भाडेवाढ दिली आहे.

मात्र टॅक्सीला रिक्षापेक्षा कमी भाडेवाढ दिल्याने काही टॅक्सी संघटनांनी विरोध करून भाडेवाढीच्या मागणीसाठी रविवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. 
रिक्षा-टॅक्सीचे भाडे ठरवण्यासाठी परिवहन विभागाने डॉ. हकीम यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नेमली होती. त्यानुसार त्यांनी तयार केलेल्या भाडेवाढीच्या सूत्रानुसार सरकारने रिक्षाला पहिल्या टप्प्यासाठी १२ रुपयांच्या मूळ भाड्यात दोन रुपयांची वाढ करून १४ रुपये एवढे केले होते, तर टॅक्सीच्या मूळ भाड्यात १ रुपयाची वाढ करून १८ रुपये इतके केले होते.

 

Leave a Comment