पाकिस्तानात अजूनही प्रेमविवाह जोखमीचा

पाकिस्तानात अजूनही प्रेमविवाह ही कल्पना बर्‍याच मोठ्या जनसमुदायाला अधार्मिक आणि अनैतिक वाटते. एखादा सज्ञान मुलगा किवा मुलगी आपल्या आई वडलांना न विचारता आपल्या मर्जीने आपल्या पसंतीच्या जोडीदाराशी विवाह करू शकतो ही कल्पना तिथल्या लोकांच्या गळी उतरत नाही. म्हणून अशी लग्ने करणारांना अजूनही जीवावर उदार होऊन लग्न करावे लागते किवा त्रास सहन करीत जगण्याची जोखीम पत्करावी लागते. 

२५ वर्षांच्या एका तरुणीने पालकांनी निवडलेल्या मुलाशी विवाह करण्याऐवजी आपल्या परिचयाच्या तरुणाशी विवाह केला याचा राग येऊन या मुलीच्या घरच्या लोकांनी या दोघांच्याही हत्येची सुपारी दिली. सुपारी किलरने त्यांना मारण्याचे दोन तीन प्रयत्न केले आणि त्यातून ते बचावले पण त्यांना सतत जीवाला सांभाळूनच जगावे लागत आहे. नुसरत मोची असे या तरुणीचे नाव आहे आणि तिच्या नवर्‍याचे नाव आहे अब्बास भट्टी. या दोघांचे लग्न होऊन  तीन वर्षे उलटून गेली आहेत. त्यांना दोन मुलेही झाली आहेत पण त्यांना अजूनही मारण्याच्या धमक्या नित्य येत असतात. असे असले तरीही नुसरतचा आपल्या लग्नाच्या निर्णयाबाबतचा निर्णय कायम आहे. आता पाकिस्तानात अनेक मुली असे धाडसी पाऊल उचलत आहेत आणि प्रचलित पद्धतीला आव्हान देत आहेत. 

परंपरेने असे विवाह बाद केले होतेच पण कायदाही त्यांच्या बाजूने नव्हता. बरीच वर्षे काही महिला संघटनांनी  आपल्या मर्जीने विवाह करण्याच्या आपल्या हक्कासाठी लढा दिला तेव्हा कोठे २००३ साली सरकारने महिलांना आपल्या मर्जीनुसार विवाह करण्याची परवानगी देणारा कायदा केला. कायदा असला तरीही प्रेमविवाह करणार्‍यांचा  त्रास काही कमी झालेला नाही. या उपरही मुली आता जीवाची जोखीम पत्करून आपल्या मनाप्रमाणे विवाह करीत आहेत.

मुलींच्या अशा वर्तनाने पुराणमतवादी धर्ममार्तंड अस्वस्थ झाले असून त्यांच्यात आता हाच एक चर्चेचा विषय झालेला आहे. असे विवाह करणारांना जास्तीत जास्त त्रस्त कसे करता येईल आणि त्यांना अशा विवाहापासून परावृत्त कसे करता येईल याचा ही मंडळी विचार करीत आहेत. पण अशी प्रकरणे न्यायालयात जातात तेव्हा न्यायालये अशा प्रेमिकांच्या बाजूने न्याय देतात आणि जुन्या विचारांच्या धर्ममार्तंडांचा नाइलाज होतो. 

महिलांच्या हक्कांसाठी काम करणार्‍या औरत फौंडेशन या स्वयंसेवी संघटनेच्या नेत्या महताज रहेमान यांनी महिलांच्या या हक्कासाठी लढा उभारलेला आहे. आपल्या मनाने विवाह करण्याची इच्छा बाळगणार्‍या मुली अधिकतर सिध प्रांतातल्या असून गरीब कुटुंबातल्या आहेत असे त्यांनी सांगितले. अशा मुलींना गरिबीमुळे विजोड पुरुषांच्या गळ्यात मारले जाते तेव्हा या मुली चिडतात आणि त्या पालकांच्या मर्जीविरुद्ध लग्न करायला तयार होतात असे रहेमान यांनी सांगितले.

पूर्वीच्या काळी पालकांच्या मर्जीच्या विरोधता विवाह करणार्‍या मुलींना ठार मारले जात असे. अशा हत्या करण्याची सुपारी घेणारा एक वर्गच होता. अशा हत्यांना सामान्य हत्यांचा कायदा लागू होत नसे. कारण ती हत्या घराण्याची इभ्रत सांभाळण्यासाठी केली गेली असून समर्थनीय आहे असे मानले जात होते. सरकारही या धार्मिक कल्पनेच्या विरोधात जात नसे. आता ही पद्धत कमी झाली आहे पण तरीही २०११ या वर्षात पाकिस्तानात अशा ९४३ हत्या झाल्या आहेत असे मानवी हक्क संघटनांचे म्हणणे आहे. अशा हत्यांवर खटले भरले तरीही त्यांच्या विरोधात  साक्ष द्यायलाही कोणी तयार होत नाही. कारण तसे करणे हे धर्माच्या विरोधात आहे असे मानले जाते. ही स्थिती असूनही तिथे महिला आपले हक्क प्रस्थापित करण्यास सिद्ध झाल्या आहेत. जोखीम पत्करून का होईना पण त्या प्रेमविवाह करायला लागल्या आहेत.