ग्रामीण भागातील टॅलंटवर लक्ष

आज भारताच्या औद्योगिक विश्वामध्ये आणि सेवा उद्योगामध्ये माणसांची चणचण फार जाणवत आहे. योग्य ते शिक्षण घेतलेली मुले किवा मुली मिळत नाहीत. त्यामुळे अनेक कंपन्यांमधली भरती कमी झालेली आहे आणि कित्येक कंपन्यांनी आपल्या विस्ताराच्या योजना थांबवल्या आहेत. कंपन्यांना अभियंते हवे असतात, एम.बी.ए. झालेले तरुण मुले आणि मुली हव्या असतात, संगणकावर काम करणारे तंत्रज्ञ हवे असतात. असे शिक्षण घेतलेले तरुण आणि तरुणी लाखांना उपलब्ध आहेत, परंतु ते अनएम्प्लाॅयेबल या सदरात मोडतात. त्यामुळे एका बाजूला सुशिक्षित तरुण-तरुणी उपलब्ध आहेत, परंतु जागाही मोकळ्या आहेत. अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. कंपन्यांची आणि उद्योगांची कोंडी झालेली आहे. 

यातली नेमकी अडचण काय? अडचण आहे सॉफ्ट स्किलची. सॉफ्ट स्किल म्हणजे संवाद कौशल्य, इंग्रजी बोलण्याचे कौशल्य, आत्मविश्वास, चटपटीतपणा आणि तणावरहित अवस्थेत काम करण्याचे कौशल्य. अशा प्रकारची कौशल्ये ग्रामीण भागातल्या मुलांच्या अंगी नसतात. त्यामुळे आपापल्या परिक्षांमध्ये उत्तम गुण प्राप्त करून सुद्धा हे विद्यार्थी नोकर्‍या मिळवू शकत नाहीत. ही मुले एखाद्या नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जातात तेव्हा त्यांच्या वागण्या-बोलण्यात त्यांच्या ग्रामीण पार्श्वभूमीचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. ते पदोपदी प्लीज, सॉरी, थँक्यू या शब्दांचा वापर करत नाहीत, अधूनमधून इंग्रजी वाक्ये टाकत नाहीत, इनशर्ट करत नाहीत, मुली असतील तर त्यांची मॅचिग व्यवस्थित नसते. आपल्या शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी त्यांनी आणलेली असतात ती व्यवस्थित फाईल केलेली नसतात. अशा सगळ्या वरवरच्या परंतु दोषांमुळे त्यांची नोकरीसाठी निवड होत नाही. 

मग मुंबई, पुणे, बंगळूर, कोलकत्ता, चंडिगढ, चेन्नई, हैदराबाद अशा मोठ्या शहरातली मले तिथे इम्प्रेशन मारून जातात. मात्र आता अशी मोठ्या महानगरातली मुले मिळेनाशी झाली आहेत. जी शहरातली मुले मिळतात ती मात्र अशी गबाळी आणि इंग्रजीचा गंध नसलेली असतात. 

आता प्लेसमेंट सेवा देणार्‍या कंपन्या आणि नोकर्‍या उपलब्ध करणार्‍या बड्या कंपन्या यांनी या स्थितीचा बारकाईने विचार करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या असे लक्षात आलेले आहे की, मॅनर्स नसल्यामुळे ज्या शहरातल्या मुलांना आपण दुलर्क्षित करतो त्या मुलांची बुद्धीमत्ता मात्र चांगली असते. कपडे, चटपटीतपणा, संभाषण कौशल्य अशा वरवरच्या गोष्टी टाळून निसर्गाने दिलेल्या बुद्धीमत्तेचा विचार केला तर असे लक्षात येते की, ज्या मुलांना आपण टाळतो त्या मुलांची बुद्धीमत्ता मोठ्या शहरातल्या मुलांपेक्षा तीव्र असते. पण प्रश्न असतो कपड्यंाचा, इंग्रजी बोलण्याचा, फायलिंगचा, पायात बूट घालण्याचा आणि उत्तम मॅचिंगचा. 

या गोष्टी काही निसर्गाने दिलेल्या नाहीत. त्या शिकून अंगी बाणवता येतात. मग अशा मुलांना या गोष्टी शिकवून, समजावून कंपनीत नोकरीला घेतले तर ही मुले पुण्या-मुंबईच्या मुलांपेक्षा चांगली कामे करू शकतात. मात्र अगदी काही दिवसांच्या प्रशिक्षणाने ज्या गोष्टी अंगी बाणवता येतात त्या गोष्टींचा विनाकारण बाऊ करून आपण चांगली बुद्धीमत्ता दुलर्क्षित करत आहोत. तेव्हा ही गोष्ट लक्षात आल्यामुळे बर्‍याच कंपन्यांनी टाईप थ्री आणि फोर या दर्जाच्या शहरातून शिक्षण घेऊन आलेल्या मुलांना नोकरीत प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. 

या मुलांचा आणखी एक फायदा या कंपन्यांना होत आहे. तो असा की, ही मुले ग्रामीण भागात नोकरी करायला तयार होतात. किंबहुना मोठ्या शहरापेक्षा ग्रामीण भागात नोकर्‍या करणे त्यांना आवडते कारण ही मुले त्याच भागातून आलेली असतात. आता अनेक बँका, विमा कंपन्या, ऑटोमोबाईल कंपन्या, मोबाईल कंपन्या यांचा विस्तार होत आहे आणि त्यांच्या लहान शहरातून मोठ्या प्रमाणावर शाखा निघत आहेत. अशा शाखांमध्ये नोकरी करण्यासाठी पुण्या-मुंबईची आणि दिल्ली-कोलकत्याची मुले तयार होत नाहीत. त्यामुळे याच ग्रामीण भागातली आणि लहान शहरातली मुले तिथे नेमावी लागतात आणि ही मुले उपलब्ध सुद्धा आहेत. एकंदरीत भारताच्या जॉब मार्केटमधील एक मोठी अडचण आता दूर झाली आहे.

 

Leave a Comment