पृथ्वीराज चव्हाण – ठाकरे भेटींमुळे राजकीय गोटात अस्वस्थता

मुंबई दि.१० -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सध्या अत्यंत अडचणीच्या परिस्थितीचा सामना करत आहेत. आघाडीचे सरकार चालविण्यासाठी ते कसून प्रयत्न करत असतानाच विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांची केली जात असलेली स्तुती त्यांच्या पक्षातील तसेच राष्ट्रवादीतील नेत्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.

विदर्भ पाटबंधारे घोटाळा प्रकरणात चव्हाण यांनी संशयित ४५ अधिकार्‍यांची चौकशी देण्याचे आदेश दिले मात्र शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी चव्हाणांवर लगेच स्तुतीसुमने उधळली. इतके करून ते थांबले नाहीत तर चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री बदलले जाऊ नयेत अशीही मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. शेवटी मुख्यमंत्र्यांनी ११ आक्टोबरला म्हणजे उद्याच आमदारांची बैठक या प्रश्नी बोलावली असल्याचे समजते.

मात्र मंत्रालयात गेले काही दिवस ठाकरे आणि चव्हाण संबंधावरून कुजबुज सुरू झाली आहे. चव्हाण आणि ठाकरे यांच्यात या काळात अनेक बैठका झाल्या आहेत. विविध विषयांसाठी या बैठका झाल्या असल्या तरी उद्धव ठाकरे, युवा सेनेचे आदित्य ठाकरे चव्हाणांना भेटत आहेत तसेच मनसेचे राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांची अनेकवेळा भेट घेतली आहे. काँग्रेसमधील वरीष्ठ नेतेही यामुळे चक्रावले असून त्यांच्या मते पक्षातील नेत्यांना भेटण्यासाठी वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ देत नाहीत मात्र ठाकरे यांनी भेटीची इच्छा व्यक्त केली की ताबडतोब वेळ दिली जाते.

एका नेत्याने याबाबत अशीही प्रतिक्रीया दिली आहे की सध्याची परिस्थिती पाहता घोटाळ्यातील अधिकार्‍यांची चौकशी कुणीही मुख्यमंत्री असला तरी थांबवू शकणार नाही. मग चव्हाणांची इतकी जाहीर स्तुती कशाला? कदाचित त्यामागे सेनेचा कांही तरी हेतू आहे. आणि नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपद मिळू नये म्हणूनही सेनेने मुख्यमंत्री बदलू नये अशी मागणी केली असण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे लिलावती रूग्णालयात दाखल असतानाही मुख्यमंत्र्यांनी त्यांची दोन वेळा भेट घेतली होती व दोन तास ते तेथे थांबलेही होते. यामागे चव्हाण यांचाही त्यांना सतत कोंडीत पकडणार्‍या राष्ट्रवादीला शह देण्याचा विचार असावा असेही मत व्यक्त केले जात आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वाधिक धोका राष्ट्रवादीकडूनच आहे.

 

Leave a Comment