स्ट्रॉबेरी वाईनचे उत्पादन सुरू

पुणे दि.८ – पुण्यातील नर्‍हे या गावाजवळ स्ट्रॉबेरी पासून वाईन बनविणार्‍या वायनरीचे काम सुरू झाले असून या प्रकल्पाची क्षमता दररोज २५ हजार लिटरची आहे. हिल क्रेस्ट फूडच्या र्‍हदम वाईन्सने हा प्रकल्प उभारला आहे.

या विषयी अधिक माहिती देताना प्रकल्पाचे प्रमुख अकल्पित प्रभुणे म्हणाले की महाराष्ट्रात द्राक्षापासून वाईन बनविण्याचे अनेक प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या वाईनला बाजारात मागणीही चांगली आहे. महाराष्ट्राने वाईन उद्योगासाठी जे धोरण जाहीर केले आहे ते उत्पादकांना फायदेशीर ठरले आहे.

आमच्या वायनरीत पांचगणी महाबळेश्वर भागातील स्वीट चार्ली आणि कामारोझा या जातीच्या स्ट्रॉबेरी पासून वाईन बनविण्यात येत आहे. लवकरच वायनरीची क्षमता २५ वरून ५० हजार लिटरवर नेण्यात येत आहे. ही वाईन रक्तातील कोलेस्टोरॉल कमी करण्यास तसेच पचनशक्ती सुधारण्यास सहाय्यकारी आहे. प्रथम ही वाईन पुणे मुंबईत उपलब्ध केली जात असून नंतर ती राज्यभर उपलब्ध केली जाईल. स्थानिक हवामानात आणि देशी मातीत वाढणार्‍या फळांच्या वाईनला जगभर मोठी बाजारपेठ असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Leave a Comment