वर्षा भोसलेंनी का केली आत्महत्या? कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई,९ ऑक्टोबर-ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची कन्या वर्षा भोसले यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वर्षा भोसले या ५६ वर्षांच्या होत्या. पेडररोड येथील ’प्रभूकुंज’ या निवासस्थानी त्यांनी सोमवारी आत्महत्या केली.
आशा भोसले सिंगापूरला ज्ण्यापूर्वी परवाना असलेले रिव्हॉल्वर घरात सुरक्षित स्थळी ठेऊन गेल्या होत्या. वर्षा यांच्या हाती रिवॉल्व्हर लागले तरी कसे? त्यांनी आत्महत्या का केली? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
वर्षा यांच्या आत्महत्येमागे प्रॉपर्टीबाबत वाद असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, भोसले परिवारातील सदस्यांनी याबाबत मौनधारण केले आहे. पोलिसांनी वर्षा यांच्या घरातून परवाना असलेले रिव्हॉल्वर जप्त केले आहे.
वर्षा भोसले नैराश्येच्या गर्तेत असताना त्यांच्याकडे रिव्हॉल्वर आले तरी कुठून ? विशेष म्हणजे वर्षा घरी एकट्या असताना रिव्हॉल्वर ठेवणे धोक्याचे होते. ते लॉकरमध्ये का नाही ठेवले? असेही काही प्रश्न निर्माण झाले आहेत.
यापूर्वी २००८ मध्येही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच, मिफ्टा सोहळ्यासाठी सिंगापूरमध्ये असलेल्या आशा भोसले तातडीने मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.
वर्षा भोसले या स्वतःही गायिका, स्तंभलेखिका होत्या. काही काळ त्यांनी पत्रकारिताही केली होती. टाईम्स दैनिकात त्यांनी काम केले होते. त्यांनी ’रेडिफ मेल’ या वेबपोर्टलसोबतही काम केले होते. वर्षा यांनी आईसोबत स्टेज शो देखील केले होते.

Leave a Comment