मोठ्या शहरांमध्ये गेल्या दोन वर्षात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याचे खेदजनक चित्र केंद्र सरकारच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. शहरांमधील जागा, प्रचंड पैसा, राजकीय आश्रय आणि पोलीस यंत्रणेतील ढिसाळपणा यामुळे या प्रमाणात वाढ झालेली आहे. वाढती समृद्धी आणि खिशात येणारा पैसा यांचा मानसिक संतुलनाशी व्यस्त संबंध आहे की काय, असा प्रश्न काही वेळा पडतो. पैशाची मस्ती असणारे लोक गुन्हेगारीकडे जास्त वळतात, असे नेहमीच दिसते. खरे म्हणजे गरीब लोकही गुन्हेगारीत गुंतलेले असतात. परंतु ते पोटासाठी गुन्हेगारी करतात. काही ठिकाणी ती त्यांच्या उपजीविकेची गरज असते.
परंतु पैसेवाले लोक गुन्हेगारीकडे का वळतात याचे कारण समजत नाही. परंतु आधी अधिकाधिक पैसा हवा म्हणून गुन्हेगारी आणि नंतर पैसा आहे म्हणून गुन्हेगारी असे गुन्हेगारीचे सत्र जारी राहते. एकंदरीत सार्या समाजालाच हा नियम लागू आहे. म्हणून भारतात गेल्या दहा वर्षात जस जशी समृद्धी वाढत आहे तस तसे गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. हातात येणारा पैसा मनाला शांती देण्याऐवजी मनाची अशांती वाढवत आहे. संस्काराशिवाय संपत्ती हा समाजाला शाप असतो हे महात्मा गांधींचे म्हणणे खरे ठरत आहे. भारतामध्ये मुक्त अर्थव्यवस्थेने समाजाच्या एका वर्गाला भरपूर पैसे मिळविण्याची सोय उपलब्ध झाली आणि त्यातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
भारताच्या समृद्ध राज्यांमध्ये हरियानाचा उल्लेख केला जातो. त्या हरियानामध्ये त्या समृद्धीतून आलेल्या बिभत्स विकृतीचे दर्शन घडत आहे. गेल्या आठ दिवसात तिथे सामूहिक बलात्काराची अनेक प्रकरणे घडली आहेत. त्यातल्या दोन बळी पडलेल्या तरुणींनी काल आत्महत्या केली. त्यातून तर राज्यात प्रचंड खळबळ माजली. या गुन्ह्यामध्ये गुंतलेले तरुण कोण आहेत, याचा थोडासा अंदाज घेतला असता असे लक्षात आले की, बड्या कंपन्यांनी करोडो रुपये देऊन ज्यांच्या जमिनी विकत घेतल्या अशा शेतकर्यांची ही मस्तवाल पोरे आहेत. त्यांनी मुख्यमंत्री भूपिदरसिंग हुडा यांच्या रोहतक जिल्ह्यात गरीब महिलांमध्ये आतंक पसरवलेला आहे.
या जिल्ह्यात गेल्या २४ तासात सामूहिक बलात्काराच्या चार घटना घडल्या आहेत. सोनेपत जिल्ह्याच्या गोहाना या गावी चौघांनी १९ वर्षे वयाच्या दलीत तरुणीवर बलात्कार केला. तिचा नुकताच विवाह झाला होता. या लोकांना पकडण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु या प्रयत्नांचा धाक अशा गुन्हेगारांना अजिबात वाटत नाही. म्हणून हा तपास सुरू असतानाच राज्यामध्ये आणखी अशा दोन घटना घडल्या. गुंडांना पोलीस आणि कायदा यांचे भय कसे राहिलेले नाही याचे हे एक उदाहरण आहे.
हा प्रकार केवळ हरियानातच सुरू आहे असे नाही. देशातल्या बहुतेक शहरांमध्ये सातत्याने असे प्रकार घडत आहेत.
दिल्लीमध्ये म्हणजे देशाच्या राजधानीमध्ये गेला महिनाभर पोलिसांचे राज्य नसून गुन्हेगारांचे राज्य आहे असे वाटावे इतकी वाईट अवस्था आहे. भर दिवसा एका कंपनीचे पाच कोटी रुपये लुटण्यात आले. त्यातले आरोपी अजून सापडलेले नाहीत. एका पत्रकाराच्या आई-वडिलांचा खून करण्यात आला. त्यातल्या त्याच्या आईचा खून तर त्याच्या डोळ्यादेखत झाला. दिल्ली शहर गेले दहा वर्षांपासून महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत कुप्रसिद्ध झाले होते. परंतु आता या शहरामध्ये सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीला ऊत आलेला आहे.
देशातील गुन्हेगारीचे प्रमाण आणि त्यामागच्या प्रवृत्ती यावर लक्ष ठेवणार्या राष्ट्रीय मंडळाने तर गेल्या पाच वर्षात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणावर वाढत असल्याचे दाखवून दिले आहे. खून, अपहरण, दरोडे, बलात्कार, चोरी, दंगल आणि हुंडाबळी अशा गुन्ह्यांच्या सर्व प्रकारांमध्ये २४ टक्के वाढ झाली असल्याचे या मंडळाने दाखवून दिले आहे. यातल्या प्रत्येक प्रकारामध्ये थोडीबहुत वाढ झालेली आहेच. परंतु बलात्काराच्या प्रकरणात २० टक्के आणि महिलांवर अन्य प्रकारे अत्याचार करण्याच्या प्रकारात ३८ टक्के वाढ झाली आहे. परंतु गुन्हेगारीच्या वाढीमध्ये सर्वांना चक्रावून टाकणारी एक वाढ विचित्र वाटत आहे. ती म्हणजे अपहरणामधली.
गेल्या पाच वर्षात अपहरणाच्या प्रकारात ८६ टक्के वाढ झाली आहे. अपहरण हा अनेक लोकांच्या जगण्याचा आणि उपजीविकेचा मार्ग झाला आहे. लहान मुलांचे, महिलांचे आणि श्रीमंत लोकांचे अपहरण करणे आणि ठराविक खंडणी वसूल करून त्यांना सोडून देणे हा प्रकार बिहार, उत्तर प्रदेश आणि देशातल्या मोठ्या शहरांमध्ये फार सामान्य झालेला आहे. विशेषत्वाने गुन्हेगारीत झालेली वाढ ही शहरांमध्ये झालेली आहे. दहा लाखांपेक्षा अधिक लोकवस्ती असलेली शहरे गुन्हेगारीची शिकार झाली आहेत. अशी ५३ शहरे भारतात आहेत आणि त्यातील गुन्हेगारीत गेल्या वर्षात ६४ टक्के वाढ झाली आहे.
या गुन्ह्यांच्या केवळ संख्येतच वाढ झाली आहे असे नाही तर गुन्हे करण्याच्या प्रकारात सुद्धा खूप बदल झाले आहेत. ठराविक सराईत गुन्हेगार आणि वेड्यावाकड्या मार्गाने पैसा कमावण्यास चटावलेले गुंड हेच केवळ गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत असे नाही तर आजवर ज्यांनी कधी गुन्हे केलेले नाहीत आणि म्हणूनच ज्यांना निरपराध, निष्पाप समजले जाते असे लोकही विविध भावनांच्या आहारी जाऊन अतीशय निर्दयपणे आपल्या निकटवर्तीयांचे खून करत आहेत.