मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही : गडकरी

गडचिरोली,९ ऑक्टोबर-मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बिलकूल नाही, त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पंतप्रधान बनवण्याचा प्रयत्न करू नयेत, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले. गडचिरोली जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एका शेतकरी मेळाव्यात गडकरी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते, तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
एखादे पद उपभोगता यावे म्हणून काम करावे असे शिक्षण मला मिळालेले नसून मातृभूमीच्या सेवेसाठी काम केले पाहिजे असे शिक्षण मला मिळाले आहे. तेव्हा पंतप्रधानपदाच्यासाठी मी काम करत नाही, मी त्या शर्यतीत नाही, असे नितीन गडकरी यांनी आज स्पष्ट केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही मला पंतप्रधान बनवण्यासाठी काम न करता देशासाठी म्हणून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आपल्या पक्षाला केंद्रात नेऊन बसवणे यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची धडपड असली पाहिजे, असेही गडकरी आपल्या भाषणात सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचेही नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे, त्यातच काही दिवसांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही सुषमा स्वराज यांचे नाव सुचवले. तसेच गडकरींचे नावही या शर्यतीत असल्याची चर्चा होती. मात्र मी या शर्यतीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment