
रांची दि. ५ – पूजा करण्याची पद्धती वेगवेगळी असली तरीही हिदुस्थानात राहणारा प्रत्येक नागरिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी हिंदूच आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. रांची येथे ’सीएमपीडीआय’च्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

रांची दि. ५ – पूजा करण्याची पद्धती वेगवेगळी असली तरीही हिदुस्थानात राहणारा प्रत्येक नागरिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी हिंदूच आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. रांची येथे ’सीएमपीडीआय’च्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मोहन भागवत म्हणाले, संघ या देशात राहणार्या प्रत्येकाला हिंदू मानतो. आपल्या देशाची ओळख हिंदू राष्ट्र अशी आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हेच सांगितले आहे. हिंदू ही काही पूजा पद्धती नव्हे. भारतातील मुस्लिम किंवा ख्रिश्चन परदेशात जातात, तेव्हा त्यांना हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन अशा उपनावाने ओळखले जाते.
सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. परंतु, सध्या देशाच्या विद्यमान स्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. जोपर्यंत देश सुखी बनत नाही, तोपर्यंत स्वतःच्या सुखाचा विचार करु नये, असे भागवत म्हणाले.
संघाची भूमिका समजावून सांगताना मोहन भागवत म्हणाले, संघाला अल्पसंख्यांक, बहुसंख्यांक यासारख्या गोष्टी अमान्य आहेत. आपण सर्व भारत मातेचे पुत्र आणि समान पूर्वजांचे वंशज आहोत. आपला सांस्कृतिक वारसा समान आहे. आमच्या मनात भेदभाव नाही. आयुष्यात राष्ट्राप्रती सकारात्मक परिवर्तन आणण्यास इच्छुक असलेला कोणीही संघात येऊ शकतो. संघाबाबत अनेक गैरसमजुती आहेत. संघाच्या शाखेत येऊन पाहा आणि मग निर्णय घ्या.
संघ हिंदू बनवेल, अशी भीती राजकीय नेते मुस्लिम आणि ख्रिश्चनांमध्ये निर्माण करतात. परंतु, आम्हाला कोणालाही हिंदू बनवायचे नाही. कारण भारतात राहणारे सर्व हिंदू आहेत. आम्हाला तुमच्या पूजा पद्धतीशी काहीही घेणेदेणे नाही. तुम्ही या. तुम्हाला निश्चितच चांगले वाटेल. परंतु, आम्ही तुम्हाला हिंदू या नात्यानेच बोलावू. अल्पसंख्यांक होण्याचे फायदे तुम्हाला मिळणार नाही. आम्ही मुस्लिमांना ’मतदार’ नव्हे तर नात्याने बंधू मानतो. सेवा करताना आम्ही कोणताही भेदभाव करीत नाही.