आंग सॅन स्यूकीना राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा

म्यानमार – म्यानमारमधील विरोधी पक्ष नेत्या आंग स्यूकी यांनी जनतेची इच्छा असेल तर राष्ट्राध्यक्ष होण्याची तयारी दर्शविली असून त्यासाठी गरज पडल्यास घटना बदलण्याचीही तयारी असल्याचे सांगितले आहे. म्यानमारमध्ये २०१५ साली सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सध्या स्यूकी विरोधी पक्ष नेत्या म्हणून काम पहात आहेत.

अमेरिकेच्या दौर्‍यावरून गेल्या आठवड्यातच मायदेशी परतलेल्या स्यूकी म्हणाल्या की मी राजकीय पक्षाची नेता आहे. त्यामुळे वेळ आल्यास राष्ट्राध्यक्ष होण्याचे धैर्य मला दाखविले पाहिजे. माझ्या देशातील जनतेची जर तशी इच्छा असेल तर ही जबाबदारी मी घेईन. देशाच्या घटनेनुसार हे पद मला मिळण्यात कांही अडचणी आहेत मात्र वेळ पडलीच तर घटना बदलायचीही आमची तयारी आहे. 

सध्याचे राष्ट्राध्यक्ष थेन सेन यांनीही स्यूकी यांच्या इच्छेचा आदर केला आहे. तेही नुकतेच अमेरिकेच्या दौर्‍यावरून परतले आहेत. ५० वर्षे लष्करी राजवटीखाली काढल्यानंतर आता म्यानमारमध्ये लोकशाही सरकार आले आहे आणि थेन सेन यांनी अनेक राजकीय सुधारणा अल्पावधीत केल्या आहेत. ते म्हणाले की स्यूकी यांची कल्पना मला मान्य आहे. देशातील जनतेचीही तीच इच्छा असेल तर लोकांचा कौल मी मान्य करेन.

 

Leave a Comment