मदुराईचे प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर

minakshi

तमिळनाडूच्या मध्यावर मदुराई वसले आहे. या मदुराईतच आहे, प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर. हिरवीगार शेती, उंच डोलणारी नारळाची झाडं नि त्याच्याशी स्पर्धा करत आकाशाकडे हात फैलावत गेलेली गोपूरे. मदुराईची ही ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील. शहराच्या बरोबर मध्ये मीनाक्षी मंदिर वसले आहे.

meenakshi-temple

मदुराईचा इतिहास फार मोठा आहे. अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून तो सुरू होतो. मदुराईवर राज्य करणार्‍या पांड्य घराण्याएवढे राज्य दुसर्‍या कोणत्याही भारतीय राजघराण्याने केले नाही. इसवी सनापूर्वी चारशे ते पाचशे वर्षे ते अकदी चौदाव्या शतकापर्यंत या घराण्याने मदुराईवर एकछत्रीपणाने अंमल गाजवला. मात्र, त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने पांड्यांचा पराभव करून मदुराईचा ताबा घेतला. काफूरने मीनाक्षी मंदिर, सुंदरेश्वरम मंदिराचे बाहेरचे दरवाजे व बुरूजही तोडले होते. सुदैव म्हणून आतले मंदिर वाचले. नंतर बाहेरचे गोपूर पुन्हा एकदा बांधले गेले.

मीनाक्षी मंदिर –  सोळाव्या शतकाच्या मध्यात विजयनगरच्या राजाने विश्वनाथ नायक याला मदुराईचा राज्यकारभार पाहण्यासाठी पाठविले. त्याच्या बरोबर सेनापती आर्यनायक मुठली हा सुद्धा गेला. नायक वंशात तिरूमलाई नायक हा सर्वांत पराक्रमी होता. त्याने १६५९ पर्यंत राज्य केले. त्याच्याच काळात मदुराईत भव्य इमारती बांधल्या गेल्या.

meenakshi-temple2

मीनाक्षी मंदिराचे सध्याचे स्वरूप हे कुणा एका राजामुळे आलेले नाही, तर अनेक राजांनी त्यात सहभाग घेतला आहे. मंदिराचे आवार भव्य आहे. २४० मीटर लांब व २६० मीटर रूंद असा हा परिसर आहे. त्याच्या या विस्तारामुळे भक्त, पर्यंटकांची दमछाक होते. काय नि किती पाहू असे होते.

 

या आवारात अनेक छोटी, मोठी मंदिरे आहेत. येथेच एका बाजूला श्यामवर्ण मीनाक्षीदेवीची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. तिच्या आजूबाजूला अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. जवळच सोन्याचा मुलामा दिलेला स्तंभ आहे. त्याच्या उत्तरेला सुंदरेश्वर मंदिरेचा गोपूर आहे.

सुंदरेश्वरम मंदिरच्या चारीही बाजूला गोपूर आहेत. त्यावर हिंदू देवदेवतांच्या, पशूपक्ष्यांच्या मूर्ती आहेत. प्रत्येक गोपूर नऊ मजली आहे. त्याचे प्रवेशद्वारे वीस मीटर उंच आहेत कुंबथडी मंडपमध्ये शंकरासह अनेक देवदेवतांच्या तसेच ऋषीमुनींच्या प्रतिमा आहेत. जवळच्याच एका कक्षात मीनाक्षी व सुंदरेश्वरजी यांची वाहने आहेत.

sundareshwar-mandir

येथेच चांदीत मढवलेला हंस व नंदी आहेत. तेथून थोड्या अंतरावर मदुराईचा राजा विश्वनाथ नायक याचा मंत्री आर्य नायक मुठलीच्या काळात बनविलेला सहस्त्रस्तंभ मंडप आहे. यात एकूण ९८५ स्तंभ आहेत. यावरही देवदेवता, नृत्यांगना, योद्धे यांच्या प्रतिमा आहेत.

या मंदिराला चार दारे आहेत. प्रवेशद्वारावर गणपतीची मोठी प्रतिमा आहे. या मंदिराबाबत एक दंतकथा आहे. मलयाराजा पंड्या निपुत्रिक होता. म्हणून राजा व राणीने एक यज्ञ केला. यावेळी अग्नीतून तीन वर्षीय बालिका प्रकट झाली. ती होमातून बाहेर पडून थेट राणी कंचनमालाकडे गेली. मोठी झाल्यानंतर या राजकुमारी मीनाक्षीने मोठा पराक्रम गाजवला. आजूबाजूच्या सर्व राजांना पराभूत करून तिने स्वतःचा एकछत्री अंमल प्रस्थापित केला. त्यानंतर कैलास पर्वतावर जाऊन शंकराची आराधना केली व त्याला पती म्हणून मिळविण्यात ती यशस्वी ठरली.

मीनाक्षी मंदिराच्या जवळच सुवर्ण पुष्करणी नावाचे सरोवर आहे. त्याच्या बाजूला सुंदर हिरवाई आहे. फेब्रुवारी महिन्यात मीनाक्षी व सुंदरेश्वर यांच्या मूर्तीला येथे आणून या सरोवरात स्नान घातले जाते.

Alagar-temple

अलगार मंदिर – मदुराईपासून अठरा किलोमीटरवर मीनाक्षीदेवाचा भाऊ अलगार याचे मंदिर आहे. त्याच्यासंदर्भातही एक दंतकथा सांगितली जाते. मीनाक्षीदेवीच्या लग्नाला अलगार निघाला होता. मात्र, नगरात पाऊल ठेवण्याआधीच त्याला लग्न झाल्याचे कळले. तो आल्यापावली परत गेला. चैत्रात मीनाक्षीदेवी व सुंदरेश्वर यांचा विवाह सोहळा होतो. विवाहनंतर वेगा नदीच्या किनार्‍यावर दोन्ही प्रतिमा आणल्या जातात. नदीच्या दुसर्‍या किनार्‍यावर अलगाराची प्रतिमा आणली जाते नंतर ती परत नेली जाते.

 

Leave a Comment