
संशोधकांनी रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने प्रलयंकारी आग विझविणारा आणि आगीत सापडलेल्यांची सुटका करू शकणारा रोबो तयार केला असून जेथे मानवी प्रयत्न अपुरे ठरतात अशा ठिकाणी हा रोबो महत्त्वाची कामगिरी बजावू शकणार आहे. विशेष म्हणजे सुरक्षित अंतरावर राहून माणूसच या रोबोचे रिमोटने नियंत्रण करू शकणार आहे.
थर्माईट रिमोट या अमेरिकन कंपनीने हा फायरफायटर रोबो तयार केला आहे. अशा प्रकारचा हा जगातला पहिला रोबो असल्याचा कंपनीचा दावा आहे. या रोबाचे डिझाईनच आग विझविणे आणि आगीत सापडलेल्यांना सुरक्षित बाहेर काढणे या कामांसाठीच केले गेले आहे. १ मिनिटात ६०० गॅलन पाणी हा रोबो ओतू शकतो तसेच त्याचा आकारही छोटा असल्याने तो सर्वसाधारण आकाराच्या दरवाजातूनही जाऊ शकतो. रोबो आकाराने छोटा असला तरी तो ५७६ किलो पर्यंतचे वजन सहज उचलू शकतो असे कंपनीचे म्हणणे आहे.
पोलाद आणि विमानात बांधणीत वापरण्यात येणार्या अॅल्युमिनियमच्या मिश्रणातून हा रोबो हाताने तयार करण्यात आला आहे. नियंत्रणाबाहेर असलेल्या गंभीर परिस्थितीत तो उपयुक्त ठरणार असून त्याचा उपयोग रासायनिक द्रवांचे स्फोट, रेल्वे डिरेलमेंट, इंधन साठ्यांतील स्फोट अशा आणीबाणीच्या परिस्थितीत होऊ शकणार आहे.