सिग्नल मोडताय ? सावध ! रोबोकॉप पाहतोय

फ्लोरिडा – अनेक शहरांत सिग्नल मोडणारे असतात. वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसविले जातात. परंतु यापुढे नियम मोडून आपलीच गाडी पुढे दामटणार्‍यांवर वचक बसविणारा आणि नियम मोडून पळून जाणार्‍यांच्या मागे लागणारा पोलिस लवकरच अवतरणार आहे. हा पोलिस असेल रोबोकॉप! अगदी इंग्रजी चित्रपटांमध्ये दाखवतात त्याप्रमाणे रोबो-पोलिस तयार करण्याचे प्रयत्न फ्लोरिडा विद्यापीठातील वैज्ञानिक करत आहेत.

वैज्ञानिकांना असे रोबो तयार करण्यात यश आल्यास, व्यग्र असलेले पोलिस किंवा स्वयंसेवक म्हणून वाहतूक नियंत्रक म्हणून काम पाहणार्‍यांच्या मदतीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी हॉलिवुडने रोबोकॉप ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. या संकल्पनेवरील चित्रपटांची मालिकाही तुफान गाजली होती. त्याच संकल्पनेचे सूत धरुन या वैज्ञानिकांनी रोबोकॉपच्या निर्मितीसाठी प्रयत्न चालविले आहेत.

या रोबोचे वैशिष्ट्य म्हणजे तो हुबेहूब पोलिसांसारखा दिसेल. शिवाय जी कामे पोलिस करु शकत नाहीत ती कामेही तो करू शकेल. अमेरिकी राखीव नौदलाचे कमांडर जेरेमी रॉबिन्स यांनी स्वतः या संशोधनात लक्ष घातले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाची सेवा करण्यासाठी अनेक व्यक्ती पोलिस दलात भरती होतात. परंतु त्याना अपंगत्व आल्यास, त्यांच्यावर नोकरी सोडण्याशिवाय पर्याय नसतो. अशा पोलिसांना सेवेतच ठेवून, त्यांचे काम हा रोबोकॉप करणार आहे.

प्रयोगशाळेत तयार होणारा हा रोबो, संकटसमयी येणार्‍या दूरध्वनींना प्रतिसाद देईल आणि उदभवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य ती कारवाई करेल. त्याचप्रमाणे नियम तोडणार्‍यांकडून दंड वसुलीचे कामही ते अतिशय सक्षमपणे करतील. रॉबिन्स यांच्या मते या रोबोचा चेहरा तयार करणे हे सर्वांत अवघड काम आहे.

 

Leave a Comment