पुण्यात आणखी सहा नोंदणी कार्यालये सुरू होणार

पुणे दि.५ – संपूर्ण महाराष्ट्रात जागांच्या खरेदी विक्रीचे, भाडेपट्ट्याचे व्यवहार लक्षणीयरित्या वाढल्याने सध्याच्या नोंदणी कार्यालयांवर येत असलेला कामाचा ताण लक्षात घेऊन राज्यभर ३१ नवी सबरजिस्टार कार्यालये सुरू करण्यात येणार आहे. पुण्यातही नवी सहा नोंदणी कार्यालये सुरू होत आहेत असे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन एस.चोकलिंगम यांनी सांगितले. सध्या राज्यभरात अशी ४६४ कार्यालये असून त्यात या नवीन कार्यालयांचीही भर पडणार आहे.

जागा खरेदी विक्री व अन्य नोंदण्यातून राज्यात सर्वाधिक महसूल देणार्‍या शहरात पुण्याचा दुसरा नंबर आहे.या कामाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन ही पद्धत अधिक वेगवान करण्यासाठी इंटरनेट व संगणकीकरणाची सुविधा पुरविली जात आहे असे सांगून चोकलिंगम म्हणाले की सध्या प्रत्येक दस्तऐवज नोंदणीसाठी साधारण अर्धा तास लागतो. हा वेळ आणखी कमी करण्याचे प्रयत्न आहेत. ०२११-१२ सालात २३,१३,८८४ नोंदण्या करण्यात आल्या आहेत आणि त्यातून १४५०० कोटींचा महसूल राज्याला मिळाला आहे. सध्या जागा खरेदी विक्री आणि भाडेकरारांची संख्या वाढतच चालली आहे. हे लक्षात घेऊन मुंबई, ठाणे व पुण्यात जादा कार्यालये सुरू करण्यात येत आहेत.

पुण्यासाठी सहा जादा कार्यालयांची परवानगी मिळाली आहे व त्यातील दोन कार्यान्वितही झाली आहेत. बाकी ३१ उर्वरित महाराष्ट्रात होणार आहेत. नोकरदार वर्गांना नोंदणी करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन ही कार्यालये दोन शिफटमध्ये सुरू राहणार आहेत. पहिली शिफ्ट सकाळी सात ते दोन तर दुसरी शिफ्ट दुपारी दोन ते रात्री नऊ अशा वेळी असेल असेही चोकलिंगम यांनी सांगितले. दोन शिफ्टमध्ये चालणारे कार्यालय कोथरूडमध्ये सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले.

 

Leave a Comment