अण्णांच्या भेटीगाठी सुरूच

पुणे दि.५ – ज्येष्ठ समाजसेवक व भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांनी गुरूवारी राळेगण सिद्धी येथे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ञ विश्वंभर चौधरी आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्याशी चर्चा केली. भ्रष्टाचार विरोधातील आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक झाल्याचे समजते. अरविद केजरीवाल, किरण बेदी अण्णांपासून दुरावल्यानंतर नव्या टीमची स्थापना करण्याचा अण्णांचा विचार आहे. हे आंदोलन अराजकीय मार्गाने व जनतेच्या जागृत सहभागातूनच पुढे नेले जावे अशी त्यांची इच्छा आहे .त्या दृष्टीने अण्णा समाजाच्या विविध थरांतील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांची मतेही विचारात घेत आहेत असे चौधरी यांनी सांगितले. 

अण्णांनी नुकतीच दिल्ली भेटीत लष्करी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या भेटी घेऊन त्यांचीही मते जाणून घेतली होती. या बैठकीला उपस्थित असणार्‍या सर्वांनीच अण्णांच्या आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे असेही समजते. पुण्यातही गेल्या महिन्यांत विविध क्षेत्रातील तज्ञांची अण्णांनी भेट घेऊन चर्चा केली होती मात्र अजून आंदोलनाचा अंतिम आराखडा तयार झालेला नाही असेही चौधरी म्हणाले.

अविनाश धर्माधिकारी या बैठकीबद्दल बोलताना म्हणाले की अण्णांनी विविध थरांतून मोठ्या प्रमाणावर पत्रे आली असून ही पत्रे अण्णा वाचत आहेत आणि त्यात लोकांनी या आंदोलनासंदर्भात व्यक्त केलेली मते आणि सूचना जाणून घेत आहेत. या चळवळीत सहभागी होऊ इच्छीणार्‍यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे मात्र त्यासाठी आणखी कांही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रम राळेगण आणि दिल्ली अशा दोन ठिकाणी करण्याचे ठरविले जात असून त्यापूर्वी अण्णा राज्यव्यापी आणि देशव्यापी दौरा करण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.