दोन आक्टोबर हा महात्मा गांधी यांची जयंती दिवस. भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचाही जन्म याच तारखेला झालेला आहे. हा विलक्षण योगायोग आहे. महात्मा गांधी यांच्याच जन्म तारखेला जन्मलेल्या शास्त्रींनी नंतर गांधींजीची शिकवण आपल्या आयुष्यात उतरवली. ते १८ महिनेच पंतप्रधान होते पण त्यांनी भारताचे सर्वात अधिक जनादरास पात्र ठरलले पंतप्रधान अशी ख्याती मिळवली होती.
ते जून १९६४ ते फेब्रूवारी १९६६ या काळात पंतप्रधान होते. त्यांच्या याच कालावधीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊन ते भारताने जिंकले होते. या युद्धाने देशाजवळच्या साधन सामग्रीची फार टंचाई जाणवायला लागली होती. त्याच काळात शास्त्रीजींनी जय जवान जय किसान असा नारा देऊन हरित क्रांतीची सुरूवात केली होती, पण त्या काळात धान्याचाही मोठा तुटवडा होता. त्यातून वाट काढण्यासाठी शास्त्रीजींनी सार्या देशवासियांना दर सोमवारी सायंकाळचा उपवास करण्याचे आवाहन केले होते. लोकांची शास्त्रीजींवर एवढी श्रद्धा होती की सारा देश त्यांच्या आवाहनावरून दर सोमवारी उपवास करीत असे. देशभरातली हॉटेले बंद असत. खानावळी बंद असत. पूर्ण भारतातल्या घरांत चुली पेटत नसत.
आता आपले नेते असे काही आवाहन करतात तेव्हा त्यांचे कोणीही ऐकत नाही कारण आपल्याला उपवास करणारे नेते स्वतः मात्र चापून जेवत असतील असे लोकांना वाटते. त्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही. शास्त्रीजींवर मात्र लोकांची श्रद्धा होती. कारण ज्या अर्थी ते आपल्याला सोमवारी उपवास करण्याचे आवाहन करीत आहेत त्या अर्थी ते स्वतःही नक्कीच उपवास करीत असतील असा लोकांचा विश्वास होता. असा नेता नंतर कोणीच झाला नाही.
शास्त्रीजींनी हा विश्वास आपल्या वर्तनाने कमावलेला होता. ते दोन खोल्यांच्या घरात रहात असत. त्यांचे स्विस बँकेत तर खाते नव्हतेच पण आपल्या देशातल्याही कोणत्या बँकेत त्यांचे खाते नव्हते. त्यांच्या घरात उंची फर्निचर नव्हते. त्यांनी आपल्या विवाहात हुंडा घेतला होता पण तोही सासरे बुवांनी फार आग्रह केल्यामुळे घेतला होता. सासर्यांनी आपल्या हुंडा म्हणून एक चरखा द्यावा असे ते म्हणाले होते. ते रेल्वे मंत्री असताना उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात झाला होता. त्याची बातमी कळताच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राजीनामा देण्याच्या आधी त्यांनी मंत्री असताना आपल्या मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठवले होते. पण मध्येच हा राजीनामा दिला. पगार बंद झाला. त्यांनी आपल्या मुलाला कळवले की आपण आता राजीनामा दिलेला आहे आणि आपला पगार आता बंद झाला आहे तेव्हा आपण आता शिक्षणासाठी पैसे पाठवू शकणार नाही. त्यांच्या मुलानेही त्यांना कळवले की त्याला आता पैशाची गरज लागणार नाही. कारण त्याने लंडनमध्ये सिटी बसचा कंडक्टर म्हणून नोकरी मिळवली होती. कमवा आणि शिकाचा अवलंब करून तो शिकत होता. आता असे घडेल का ?