
लंडन दि.३ – विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याने स्वीडनला होणारे त्याचे हस्तांतरण टाळण्यासाठी लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात राजाश्रय घेतल्याची बातमी आता जुनी झाली असली तरी त्यापोटी ब्रिटन सरकारला मात्र खर्चाचा चांगलाच टोला बसला असल्याचे आता उघडकीस येत आहे. असांजेला राजाश्रय देण्यास इक्वेडोर सरकारने संमती दर्शविली असली तरी दूतावासातून असंाजे बाहेर येताच त्याच्यावर झडप घालून त्याला जेरबंद करण्यासाठी ब्रिटन पोलिसांनी अहोरात्र जागता पहारा ठेवला आहे. त्यासाठी सरकारला दररोज ११ हजार पौंड म्हणजेच ९ लाख ३० हजार रूपये खर्चावे लागत आहेत. आत्तापर्यंत हा खर्च ८ कोटी ४० लाखांवर गेला आहे. लंडनच्या मेयरनीच ही माहिती दिली असून अजून अंतिम बिल आलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
