अजित पवार यांनी राजीनामा देऊन चूक केली आहेच. पण आता ते झंझावाती वगैरे दौरा करून त्यापेक्षा मोठी चूक करीत आहेत. राजीनामा देऊन त्यांनी केलेली चूक त्यांच्या वैयक्तिक राजकारणातली चूक ठरली आहे पण, त्याचा झंझावाती दौरा ही त्यांच्या पक्षाला महागात पडणारी चूक ठरणार आहे. मुळात अजितदादा यांना शरद पवारांचे पुतणे म्हणूनच राजकारणात एवढी चाल मिळाली आहे. आपण यंव करीत असतो आणि त्यंव करीत असतो अशा बढाया ते मारत असले तरी त्यांच्या या बढाया केवळ पवारांचे पुतणे म्हणूनच खपून जातात. त्यांच्यात संघटना बांधण्यासाठी आवश्यक ते गुण अजिबात नाहीत.
काका पक्षाला वाचवा, पुतण्यापासून
आजवर प्रशासनात त्यांच्या गमजा खपून गेल्या आता संघटनेत ते आपली मिजास मिरवायला लागले तर त्यांची मिजास पक्षातले अनेक कार्यकर्ते दुखवण्यास कारणीभूत ठरू शकते. म्हणून त्यांनी स्वतःच पक्षाची बांधणी करण्याच्या भानगडीत पडू नये पण ते आपल्या मनानेच संघटनात्मक काम करीत असतील तर त्यांना पवारांनी रोखले पाहिजे. कारण हे संघटनात्मक काम पक्षाच्या मुळावर येणार आहे.
आता ते संघटनात्मक कामाच्या निमित्ताने फिरताना आपल्या राजीनाम्याबाबत काही खुलासे करीत आहेत.
राजीनामा दिला, झाले. आता संघटनात्मक काम करताना राजीनाम्याची चर्चा कशाला करायला हवी ? पण ते तशी चर्चा करीत आहेत आणि बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने अधिकच फसत चालले आहेत. आपण राजीनामा देऊन चुकलो आहोत तेव्हा त्याबाबत काहीही न बोलता त्यांनी काय करायचे ते संघटनात्मक काम केले पाहिजे पण खुलासे करताना ते फारच बालीशपणा करायला लागले आहेत. आपण राजीनामा दिला नसून तोंडावर फेकला आहे असे ते काल अकोल्यात बोलताना म्हणाले. आता राजीनामा देणे आणि फेकणे यात काय फरक आहे हे काही कळत नाही.
आपल्यावर आरोप होत असताना आपल्याला पदावर राहणे योग्य वाटले नाही असे ते म्हणतात. त्यांच्या अशा प्रतिपादनामुळे छगन भजबळ, सुनील तटकरे अशा आरोप झालेल्या मंत्र्यांची पंचाईत होत आहे कारण त्यांनी अजित पवार यांच्या प्रमाणे आरोप होऊनही आपल्या पदांचे राजीनामे दिलेले नाहीत.
मग आरोप होताच राजीनामा देणे योग्य की अयोग्य असा प्रश्न निर्माण होतो. योग्य असेल तर अजित पवारांचा राजीनामा योग्य असेलच पण मग याच तत्त्वाने भुजबळ आणि तटकरे यांनी राजीनामे का द्यायचे नाहीत ?
एवढेच कशाला अजित पवारांच्या या पवित्र्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचीही पंचाईत झाली आहे. आजवर शरद पवार यांच्यावर काय कमी आरोप झाले आहेत का ? मग त्यांनी राजीनामे का दिले नाहीत ? मग त्यांनी राजीनामा ने देणे ही चूक आहे का ? यावर अजित पवार काय म्हणणार आहेत ? ते काही म्हणायला गेले तरीही मुळात त्यांचा राजीनामा चुकीचा असल्यामुळे ते या बाबत काहीही बोलायला गेले तरीही अनेक जण दुखावले जाणार आहेत. काल त्यांनी कोणाचे नाव न घेता, त्यांनी आपल्या कोळशातले काळे आमच्या अंगावर फेकले आहे असे म्हणत आपल्यावर निष्कारण आरोप होत आहेत असे सूचित केले. आता हे त्यांनी काँग्रेसला उद्देशून बोललेले होते हे उघड आहे. पण त्यांना काँग्रेसचे नाव घ्यायचे नाही.
मग आज पत्रकारांनी याबाबत खुलासा विचारला असता, आपण ते काँग्रेससाठी बोललो नसून भाजपासाठी बोललो आहोत अशी सारवासारव सुरू केली. हा सारा बालीशपणा आहे. त्यांनी भाजपावर तरी असा आरोप करायचा आहे की नाही हे शरद पवार ठरवणार आहेत. कारण पवारांना कोणालाच दुखवायचे नाही. पवारांचे सर्वांशीच सलोख्याचे संबंध असतात. ते कामापुरती टीका करतात आणि आपल्यावर आरोप झाल्यावर संयमी भाषेत उत्तर देतात. पण अजित पवारांच्या जिभेचा दांडपट्टा तर सर्वांनाच दुखावत चालला आहे. काकांना ते परवडणार आहे का?
अजित दादांनी संघटनात्मक कामाला वाहून घेण्याचा निर्णय स्वतःच घेतला आह. या कामाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी बोलून घोटाळा करून ठेवला आहे. त्यांचा संघटनात्मक झंझावात असाच जारी राहिला तर त्याने विरोधकांच्या तंबूत घबराट पसरण्याऐवजी राष्ट्रवादीचाच तंबू उडून जाईल. अजित पवार राजीनाम्या बाबत बरेच काही बोलत आहेत हे खरे पण त्यांच्या भ्रष्टाचाराचा फर्स्ट हँड पंचनामा करणार्या विजय पांढरे यांच्याविषयी चकार शब्दही बोलत नाहीत. पांढरे यांनी धरणाच्या कामात वापरल्या जाणार्या सिमेंट बाबत काही प्रश्न शासकीय पातळीवर उपस्थित केले होते. त्याबाबत अजित पवार काहीही बोलत नाहीत. खरा मोक्याचा प्रश्न तोच आहे. म्हणून ते ज्या ठिकाणी जातील तिथे अशा काहीही थापा मारतील तर तिथले शेतकरी आणि धरणाची वस्तुस्थिती माहीत असलेले लोक त्यांच्या थापा उघड्या करतीलच.
पहिले दोन दिवस तर त्यांची अशीच अवस्था झाली आहे. त्यांनी कोळशातल्या काळ्यांबाबत काँग्रेसचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केला पण पाण्यातल्या पांढर्यावर ते चकार शब्दही बोलत नाहीत.