…तर सोनियांची माफी मागू: मोदी

अहमदाबाद: सरकारने मागील ३ वर्षात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेश वार्‍यांसाठी शासकीय तिजोरीतून १८०० कोटी रुपयांची खिरापत वाटल्याच्या आपल्या आरोपाचे सरकारने खंडन केल्यास आपण सोनियांची जाहीर माफी मागू; अशा शब्दात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारला आव्हान दिले आहे.

एकीकडे काटकसर आणि साधेपणाची भाषा करणारे संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार प्रत्यक्षात कॉग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रदेश दौर्‍यावर जनतेचा पैसा निरर्थक उडवीत असल्याचा आरोप मोदी यांनी केला. सोनियांच्या विदेश दौर्‍याच्या खर्चाची आकडेवारी जाहीर करण्याचे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.

सोनिया गांधी लवकरच गुजरात निवडणुकांच्या प्रचारासाठी सौराष्ट्रात येणार असून राजकोट येथे त्यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी त्यांच्यासह केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.

सोनियांनी ८ वेळा आपल्या आजारी आईची भेट घेण्यासाठी अमेरिका दौरा केला. या दौर्‍यासाठी त्यांना खास विमान आणि केवळ पंतप्रधान, राष्ट्रपती यांना दिल्या जाणार्‍या सुविधा देण्यात आल्या. या दौर्‍यासाठी जनतेचे १८०० कोटी रुपये खर्च झाले. एवढ्या निधीतून सौराष्ट्राच्या ४ जिल्ह्यांच्या वार्षिक अंदाजपत्रकाची सोय होऊ शकते; असा दावा मोदी यांनी केला. हा खर्च जनतेच्या पैशातून का करण्यात आला असा सवालही त्यांनी केला.

मोदी हे सोनियांच्या दौर्याबाबत खोटे आरोप करीत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना खोटे बोलायला शिकविले आहे; असा प्रतिहल्ला काँग्रेस प्रवक्ते दिग्विजय सिंह यांनी केला.

Leave a Comment