सोन्याचा हिरेजडीत आयफोन ५ -किंमत फक्त १८ लाख

लंडन दि.१ – लिव्हरपूल येथील डिझायनर स्टुअर्ट ह्यूज यांनी आयफोन पाच चे स्वतःचे सोने व हिरेजडीत व्हर्जन बाजारात उपलब्ध केले असून हा लिमिटेड एडिशन फोन आपल्याला हवा असेल तर घाई करावी लागेल. फोन बुकींगसाठीही आणि पैसे जमविण्यासाठीही. कारण स्टुअर्टने असे फक्त १०० च हँडसेट विक्रीसाठी उपलब्ध केले असून त्यांची किंमत आहे १७,७६,८८८ रूपये म्हणजेच २१९९५ पौंडस.

हे व्हर्जन स्टुअर्ट यांनी १८ कॅरेट सोन्यात बनविले असून त्यासाठी १२८ ग्रॅम सोने वापरले गेले आहे. हाताने बनविलेला हा आकर्षक आयफोन थोडासा फिरविला की त्यांत हिर्‍याने जडविलेला अॅपलचा लोगोही दिसतो. या लोगोसाठी उच्च दर्जाचे ५३ हिरे वापरले गेले असून त्याचे वजन १ कॅरेट इतके आहे. हँडसेटची मेमरी आहे ६४ जीबी.

अर्थात स्टुअर्ट यांचे हे पहिलेच उत्पादन नाही. त्यांनी यापूर्वी आयफोन दोनचेही असेच व्हर्जन विक्रीसाठी उपलब्ध केले होते. या गोल्ड हिस्टरी एडिशनमध्ये  चोवीस कॅरट सोने वापरण्यात आले होते व १२ कॅरटचे हिरेही. ५३ हिर्‍यात अॅपलचा लोगो बनविण्यात आला होता व या हँडसेटचे वजन होते तब्बल २००० ग्रॅम आणि किंमत पाच लाख डॉलर्स.

 

Leave a Comment