शिवसेनाप्रमुख आणि मनसे अध्यक्षांची भेट

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ येथे जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ही भेट घेतली असून यात कोणतेही राजकारण नाही; असा खुलासा मनसेच्या सूत्रांनी केला.

शिवसेना कार्याध्यक्ष पदावर बाळासाहेबांनी आपले पुत्र उद्धव यांची नियुक्ती केल्यापासून नाराज असलेल्या राज यांनी मनसेची स्थापना करून वेगळी चूल मांडली. त्यानंतर राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. मात्र कौटुंबिक नाते लक्षात घेऊन उद्धव यांच्या आजारपणात राज यांनी त्याची काळजी घेतली. या निमित्ताने त्यांच्या संवादाला सुरुवात झाली. आझाद मैदान हिंसाचारानंतर राज यांनी काढलेला मोर्चा आणि घेतलेली भूमिका याची उद्धव आणि बाळासाहेबांनी पाठराखण केली. या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबियांमधील कटुता लोप पावल्याची भावना निर्माण झाली.

सोमवारी सकाळी राज यांनी मातोश्री येथे जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेतून मनसेत आलेल्या काही कार्यकर्तेही उपस्थित होते. बाळासाहेब काही काळापूर्वी उपचारार्थ रुग्णालयात दाखल असल्यापासून त्यांची भेट न झाल्याने सोमवारी त्यांची भेट घेतल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment