लाहोरमधील चौकाला भगतसिंग यांचे नाव

लाहोर दि.१- ब्रिटीश राजवटीविरोधात जंग पुकारून स्वातंत्र्यासाठी हसतहसत फासावर चढलेल्या क्रांतीवीर भगतसिंगाच्या बलीदानाचे स्मरण म्हणून लाहोर येथील शादमन चौकाचे नांव बदलून भगतसिंग चौक असे करण्यात येणार असल्याचे समजते. लाहोर शहरात गेली कांही वर्षे कांही ठिकाणांना असलेली हिंदू नावे बदलली जात असताना भगतसिगांचे नांव चौकाला देण्यात येत असल्याने तेथील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.  

या चौकाचे नामकरण रेहमत अली असे करावे असा प्रस्ताव प्रसिद्धी अधिकारी नदीम गिलानी यांनी मांडला होता. मात्र जिल्हा प्रशासन प्रमुख नरूल मेंगल यांनी हा प्रस्ताव फेटाळताना भगतसिगांचे नांव एका आठवड्याच्या आत या चौकाला देण्यात यावे असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मेंगल या विषयी बोलताना म्हणाले की, भगतसिंग यांनी उपखंडाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली.ब्रिटीश सरकारने त्यांना लाहोर तुरूंगात मार्च १९३१ रोजी फासावर चढविले. त्यांचे बलिदान फार मोठे आणि प्रेरणादायी आहे. ज्या तुरूंगात त्यांना फाशी दिले गेले तेथेच आता हा चौक आहे.

पाकिस्तानी घटनेने मुस्लीम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू पाकिस्तानी नागरिकांना समान हक्क दिले आहेत त्यामुळे भगतसिंग यांच्या नावाला आक्षेप घेतला जाऊ नये असेही मेंगल यांनी स्पष्ट केले आहे. तसेच यावर नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सार्वजनिक नोटीस जारी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

 

Leave a Comment