नवी दिल्ली: एकीकडे केंद्र शासनाच्या आर्थिक सुधारणांच्या निर्णयाचा निषेध करतानाच भविष्यात डाव्या किंव्या उजव्यांच्या आघाडीबरोबर न जाण्याचे सांगत तृणमूल काँग्रेसने पुन्हा संयुक्त पुरोगामी आघाडी; अर्थात काँग्रेसशी घरोबा करण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत.
रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता, डीझेल दरवाढ आणि सिलेंडरचे रेशनिंग या निर्णयाच्या विरोधात सरकार आणि आघाडीतून बाहेर पडणाऱ्या तृणमूल काँग्रेसने राजधानी दिल्लीत या निर्णयांविरोधात मोर्चा काढला. पक्षाध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
‘ हे केवळ धरणे किंवा मोर्चा नाही; तर हा आर्थिक सुधारणांच्या नावाखाली सरकारने घेतलेल्या निर्णयांचा निषेध आहे;’ असे ममता यांनी सुनावले. या आंदोलनासाठी मी बंगालमधून एकही कार्यकर्ता आणलेला नाही. सर्वसामान्य जनता या निर्णयांचा निषेध करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरली आहे; असा दावाही त्यांनी केला.
सेन्सेक्स हा सर्वसामान्य नागरिकांच्या आनंदाचा निर्देशक नाही. सेन्सेक्स वर जाण्याने ज्यांना आनंद होतो; ते केवळ पैशाच्या मागे लागलेले लोक आहेत. हा मोर्चा त्यांच्यासाठी नसून ममता दीदींना ‘आम आदमी’ची काळजी आहे. हे आंदोलन हा ‘आम आदमी’चा आवाज आहे; असे पक्षाचे नेते के.डी. सिंग यांनी नमूद केले.
दुसरीकडे तृणमूल काँग्रेस भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार नाही; अशी घोषणा पक्षाचे सरचिटणीस मुकुल रॉय यांनी कोलकाता येथे केली. त्याचप्रमाणे डाव्या पक्षांचा सहभाग असलेल्या कोणत्याही आघाडीत पक्ष सहभागी होणार नसल्याचेही ते म्हणाले. पुन्हा संपुआबरोबर जाण्याची पक्षाची तयारी असल्याचे त्यांनी सूचित केले. मात्र त्यापूर्वी आघाडी सरकारला थेट विदेशी गुंतवणूक आणि डीझेल दरवाढ हे निर्णय मागे घ्यावे लागतील; असेही ते म्हणाले.