देशात व्यापक जनआंदोलन उभारणार: अण्णा हजारे

नवी दिल्ली: देशात परिवर्तन घडविण्यासाठी राजकारणाचा मार्ग चोखाळणे अयोग्य असून देशाला एका व्यापक जनआंदोलनाची आवश्यकता आहे; असे मत प्रतिपादन करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांचे एकेकाळचे खंदे सहकारी अरविंद केजरीवाल यांना आणखी एक टोला लगावला. या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून आपण लवकरच संपूर्ण देशाचा दौरा करणार असल्याची घोषणाही अण्णांनी केली.

देशाला परिवर्तनासाठी राजकीय पर्यायाची नव्हे तर व्यापक जनआंदोलनाची आवश्यकता असून अशा पद्धतीचे जनआंदोलन संघटीत करण्यासाठी आपण आगामी दीड वर्ष देशातील गाव अन गाव पिंजून काढणार असल्याचे सांगून दिल्ली येथे दाखल झालेल्या अण्णांनी राजकारणाद्वारे भ्रष्टाचार संपविण्याची भाषा करणे ही वंचना असल्याची टीका केली. दिल्लीत येण्यापूर्वी पुण्यात अण्णांनी; राजकारणाने भ्रष्टाचार विरोधी आदोलानात फूट पाडल्याचा आरोप करून केजरीवाल आणि राजकीय पर्यायाचे समर्थन करणार्‍या आपल्या जुन्या सहकार्‍यांवर शरसंधान केले.

केजरीवाल यांच्याशी काडीमोड घेतल्यानंतर आपली आगामी रणनीती निश्चित करण्यासाठी रविवारी दिल्लीत दाखल झालेले अण्णा पुढच्या दोन दिवसात मेधा पाटकर यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त आयएएस, आयपीएस अधिकारी यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.