ब्रिटनमध्ये चर्च आवारात योगा करण्यास मनाई

लंडन दि.२७ – चर्चच्या जागेत योगवर्ग घेण्यास सेंट एडमंड चर्चच्या धर्मगुरूंनी  कोरी विथेल या महिलेला मनाई केली असून दोन महिन्यांचे वर्ग संपायला दहा दिवस बाकी असतानाच हे वर्ग बंद करायला लावले आहेत. योगानसे हा हिंदू धर्मातला प्रकार असल्याने ख्रिश्चन धर्म पाळणार्‍या चर्चमध्ये हे वर्ग घेता येणार नाहीत असे कारण त्यामागे देण्यात आले आहे.

कोरी सांगते, दोन महिन्यांपूर्वीच मी चर्चमधील हॉल योगवर्गांसाठी बुक केला . त्यासाठी १८० पौंड भाडे भरले. मात्र वर्ग सरू झाल्यानंतर चर्चच्या पाद्रींनी हा हॉल कॅथॉलिक चर्चचा असल्याने तो कॅथॉलिक चर्चच्या अॅक्टीव्हिटीसाठी आणि गॉस्पेलच्या प्रचारासाठीच वापरता येईल असे सांगितले. योग ही हिंदू धर्मातली प्रथा आहे असेही कारण त्यामागे देण्यात आले. मात्र कोरीच्या मते आज इतकी वर्षे ती योगा करते आहे पण त्याबाबतीत अशी धार्मिक बाब कधीच ऐकली नव्हती. मी शरीर आणि मनाला शांती व उत्साह देणारा एक व्यायामप्रकार म्हणूनच हे वर्ग घेते. हा प्रकार स्पिरीच्युअल असेल पण धार्मिक नाही.

मात्र लंडनमधील तज्ञांच्या मते या संबंधात कोणतेही विशेष असे राष्ट्रीय धोरण नसल्याने एखाद्या चर्चच्या आवारात कोणते कार्यक्रम घ्यायचे आणि कशाला परवानगी नाकारायची हे संबंधित चर्चच्या धर्मगुरूच्याच हाती असते त्यामुळे यावर जास्त बोलता येणार नाही.

 

Leave a Comment