भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा भारतीयांचे सरासरी आयुर्मान ३२ वर्षे होते. आता ते वाढून ५६ वर्षे झाले आहे. ते अजून वाढायला हवे. वाढूही शकते. अमेरिकेचे सरासरी आयुर्मान ८० वर्षे आहे. १९०० साली ते केवळ ४७ वर्षे होते. पण वैद्यकीय मदत, राहणीमान आणि पोषण द्रव्यांचा पुरवठा यामुळे ते वाढले. विज्ञानाने लावलेल्या नवनव्या शोधांचा त्यांना फायदा झाला. त्यात अनेक अँटीबायोटिक्स आणि बायपास सर्जरी यांचा समावेश करावा लागेल. कर्करोगांवरही काही औषधे उपलब्ध झाली आहेत त्यांचाही अनेकांचे आयुष्य वाढण्यास उपयोग झाला आहे.
आणखी काही नवी तंत्रज्ञाने समोर येत आहेत. माणसाच्या आयुर्मानावर त्याच्या शरीरातल्या पेशींतील जनुकांचाही परिणाम होत असतो. त्यांत बदल करून अमेरिकेतल्या लोकांचे आयुष्य आणखी वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. स्टेम सेल्स, एजिंग बायालॉजी, मॉल्युक्युलार बायोडायनामिक्स, जेनेटिकल इंजिनियरिंग यांच्या साहयाने तसेच नवीन तंत्रज्ञाने आणि औषधे यांच्या वापराने माणसाचे जीवन अधिक सुसहय, निरामय करण्याचे प्रयत्न होत आहेत. ते निरामय होणे म्हणजेच आयुर्मान वाढणे.
अमेरिकेत नॅशनल इन्स्टिटयूट ऑन एजिंग या संस्थेने वृद्धत्वातल्या समस्यांवरच संशोधन सुरू केले आहे. या अवस्थेतले आरोग्याचे प्रश्न सुटावेत हा त्यांचा हेतू आहे. आयुर्मान वाढावे हा काही संशोधनाचा हेतू नाही पण या संशोधनाचा फायदा होऊन किवा त्याचा बाय प्रॉडक्ट म्हणून आयुर्मान वाढणारच आहे. काही लोकांनी अमर होण्याची गोळी शोधण्याचा अट्टाहास सुरू केला आहे. तर काहींनी वृद्धत्व न येणारी लस शोधण्याचा खटाटोप सुरू केला आहे. त्यांच्या संशोधनाला यश येईल की नाही हे काही सांगता येत नाही पण आले नाही तरीही आता उपलब्ध असलेल्या सोयींमुळे आणि तंत्रांमुळे या शतकात अमेरिकेचे सरासरी आयुर्मान वाढणारच आहे. ते महिलांच्या बाबतीत १०० वर्षे आणि पुरुषांच्या बाबतीत ९० वर्षे होईल. अन्य विकसनशील देशांत ते महिलांच्या बाबतीत ९० वर्षे आणि पुरुषांच्या बाबतीत ८० वर्षे होईल.
हे तर होणारच आहे पण लोकांना काय वाटते ? त्यांना किती जगायचे आहे याचा शोध घेतला पाहिजे. अमेरिकेतल्या डेव्हिड इ. डंकन यांनी देशातल्या ३० हजार लोकांकडून एक प्रश्नावली भरून घेतली. त्यात त्यांनी एक प्रश्न विचारला होता. तुम्हाला किती वर्षे जगावेसे वाटते ? उत्तर देण्यासाठी डंकन यांनी चार पर्याय दिले होते. १) पहिला पर्याय ८० वर्षे. जी आताची आयुर्मर्यादा आहे. २) दुसरा पर्याय १२० वर्षें. ही माणसाची कमाल आयुर्मर्यादा आहे. आजवर सर्वात अधिक काळ जगलेला ज्ञात माणूस एवढा जगलेला आहे. ३) तिसरा पर्याय १५० वर्षे. ही वयोमर्यादा विज्ञानाच्या साहयाने गाठणे शक्य आहे असे डंकनचे मत आहे आणि ४) असली काही मर्यादा न घालता १५० वर्षांपेक्षाही अधिक जगणे.
या प्रश्नावलीला काय उत्तरे आली असतील ? ६० टक्के लोकांनी ८० वर्षे पुरेत असे म्हटले. ३० टक्के लोकांनी १२० वर्षांचे आयुष्य मागितले. १० टक्के लोकांनी १५० वर्षांचे आयुष्य मागितले. तर एक टक्क्यापेक्षाही कमी लोकांनी त्यापेक्षा अधिक आयुष्य किवा मृत्यूच नको असे म्हटले. लोकांचे म्हणणे काहीही असो पण आयुर्मानावर परिणाम करणारी काही ठोस संशोधने पुढे यायला लागली आहेत. काही लोकांनी वृद्धत्वाची चिन्हे टाळणारी गोळी तयार करीत आणल्याचा दावा केला आहे. अशी गोळी बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही पण तेवढी एकच गोळी हे काम करील असे काही वाटत नाही. गोळी सोबत अन्यही काही उपचार करण्याची शिफारस होईल. आयुर्मान वाढणे हा अनेक उपचारांचा परिणाम असेल.
आयुष्य वाढणे हा काही चमत्कार नाही. सातत्याने केल्या जाणार्या संशोधनाचा तो परिपाक असतो. वृद्धत्व लांबणीवर टाकणारी गोळी हाही काही चमत्कार नाही. मात्र ती गोळी सांगताना, चमत्काराच्या भाषेत सांगितली जात असत. या गोळीचे घटक कोणते याचे तपशील ऐकल्यावर आपल्याला ती गोळी म्हणजे अनेक गुंतागुंतीच्या संशोधनांचे फलित असल्याचे लक्षात येते. आयुर्मान वाढण्याचे तसे अजूनही काही प्रयत्न होत आहेत. त्या शोधांचे विश्लेषण केल्यावर त्यांनी आयुष्य वाढू शकेल अशी खात्री पटली पाहिजे. स्टेम सेल्सचा वापर हे तंत्रज्ञान आता असे तर्कशुद्ध ठरायला लागले आहे आणि त्यांच्या उपचारांनी अनेकांना गुण यायला लागला आह. स्टेम सेल्सचा वापर करून कृत्रिम अवयव तयार केले जात आहेत. ते अवयव चांगले कामही करीत आहेत. तेव्हा म्हातारपण यायला लागले की एकेक अवयव निकामी होत जातो. त्या जागी नवा अवयव तयार करून बसवला की वृद्धत्व लांबू शकेल म्हणजे हा उपचार आता शक्यतेच्या कोटीत आला आहे.
मुख्य प्रश्न असा आहे की, असे कृत्रिम रित्या आयुष्य वाढवण्यापेक्षा आणि वाढलेले आयुष्य कण्हत कुंथत जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा जेवढे मिळाले आहे तेवढे जीवन जगावे. वरचे बोलावणे आले की जगाचा निरोप घ्यावा. उगाच जादा जगून नव्याने जन्माला येणार्यांच्या जागा, नोकर्या अडवून बसू नये. अल्बर्ट आइन्स्टाईन सत्तरीतच पोटाच्या विकाराने मरण पावला. त्याला शस्त्रक्रिया करून जगवण्याचा प्रयत्न सुरू होता पण त्याने शस्त्रक्रियेला नकार दिला. आपले आयुष्य संपले आहे, मिळालेल्या आयुष्यात आपल्याला जे काही करायचे होते ते केले आहे.. आता जास्त जगणे नाही. असे तो म्हणाला. सर्वांनाच त्याच्यासारखी सबुद्धी सुचेल ?