स्वतः निर्णय घेऊन फोटो काढणारा कॅमेरा

लंडन दि. २५ – कोणत्या क्षणाला फोटोत बंदिस्त करायचे याचा निर्णय स्वतःच घेणारा कॅमेरा ब्रिटीश मेकर ओएमजी कंपनीने तयार केला असून येत्या नोव्हेंबरपासून तो विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. ऑटोग्राफर असे या कॅमेर्‍याचे नामकरण करण्यात आले आहे. त्यात पाच बिल्ट इन सेन्सर व मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहे. हा कॅमरा गळ्यात घालता येणार आहे, कपड्यांत अडकविता येणार आहे किवा आपल्याला हव्या त्या जागी बसविता ही येणार आहे. युजरने कोणताही हस्तक्षेप न करता एखाद्या समारंभाचे, विशिष्ठ ठिकाणाचे, अथवा कौटुंबिक कार्यक्रमातील कोणते क्षण टिपायचे याचा निर्णय घेऊन हा कॅमेरा फोटो काढणार आहे. विशेष म्हणजे १ दिवसांत हा कॅमेरा दोन हजार फोटो काढू शकणार आहे.

ओएमजी कंपनीने बनविलेले हे पहिलेच कन्झुमर डिव्हाईस आहे. यात स्टॉप मोशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. कॉम्प्युटर गेम डेव्हलपिंग पासून ते रस्ते सर्वेक्षणापर्यंतच्या टेक्नॉलॉजी या कंपनीने तयार केल्या आहेत. हा कॅमरा बनविताना सुरवातीला कंपनीचा उद्देश स्मृतिभ्रंश झालेल्यांना मेमरीसाठी मदत करणे हाच होता मात्र अशा लोकांचे कुटुंबियही या उपकरणाचा वापर करतात असे आढळल्यानंतर कंपनीने सर्व जनता वापरू शकेल असा हा कॅमरा बनविण्याचा निर्णय घेतला.

कंपनीचा प्रमुख निक बोल्टन याच्या मते हा कॅमेरा स्टील फोटोग्राफी आणि व्हिडीओ यांच्यामधला प्रकार आहे. तुम्ही अनुभवलेल्या एखाद्या विशिष्ट दिवसाचा पुनःप्रत्यय या कॅ मेर्‍यामुळे पुन्हा घेता येऊ शकतो. या कॅमेर्‍याची किमत ६५० डॉलर्स असून तो लवकरच जपान आणि यू.एसमध्येही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Leave a Comment