आता शूज दाखवतील तुम्हाला घराची वाट

बालवाङमयात अजरामर असलेल्या सिंड्रेलाच्या गोष्टीतील काचेचे बूट आठवतात? एका क्षणात कोणत्याही ठिकाणी नेणारे हे बूट प्रत्यक्षात घालायला नाही तर किमान पाहायला तरी मिळावेत असे बालपणी प्रत्येकाला खात्रीने वाटत असणार. तीच गोष्ट १९३९ साली प्रकाशित झालेल्या विझार्ड ऑफ उझची.. या कथेतील डोरोथीचे बूट, डोरोथीने त्यांना स्पर्श करताच तिला घरी घेऊन जात असत. या कथेमुळे प्रभावित झालेल्या ब्रिटीश डिझायनर डोमिनिक विलकॉक्स याने असे बूट बनवायचा ध्यास घेतला आणि ते प्रत्यक्षात तयारही केले आहेत. अर्थात त्यासाठी त्याच्या उपयोगाला आले आधुनिक तंत्रज्ञान. संगणक प्रणाली, जीपीएस सिस्टीम आणि यूबीएस केबल याचा वापर त्याने त्यासाठी केला आहे.

हे बूट तुमच्या पायात असतील तर तुम्ही कुठेही असलात तरी ते तुम्हाला घरी जाण्याची दिशा दाखवितील आणि त्यासाठी मार्गदर्शनही करतील असे डोमिनिकचे म्हणणे आहे. बूटात त्याने त्यासाठी पीसी सॉफ्टवेअर बसविले असून ते यूएसबी केबलने जोडलेले आहे. डाव्या बुटाच्या तळव्यात जीपीएस अँटेना बसविली आहे त्याला एलइडी कंपास जोडला आहे. डावा बूट उजव्या बुटाशी वायरलेस संपर्क साधतो आणि मग या बुटाला घरी पोहोचण्यासाठी कोणत्या दिशेने किती जावे लागेल याची माहिती मिळते आणि माणूस अगदी कुठेही न हरवता व्यवस्थित घरी पोहोचतो. आहे ना कमाल?

Leave a Comment