
नवी दिल्ली दि.६- देशातील सर्वात मोठया वाहन उत्पादक मारूती सुझुकी कंपनीने त्यांच्या गुरगांव आणि मणेसर प्रकल्पातील कर्मचार्यांना भरीव वेतनवाढ जाहीर केली असून ही वेतनवाढ सरासरी १५ हजार रूपये इतकी आहे.

नवी दिल्ली दि.६- देशातील सर्वात मोठया वाहन उत्पादक मारूती सुझुकी कंपनीने त्यांच्या गुरगांव आणि मणेसर प्रकल्पातील कर्मचार्यांना भरीव वेतनवाढ जाहीर केली असून ही वेतनवाढ सरासरी १५ हजार रूपये इतकी आहे.
मारूतीच्या मणेसर येथील प्रकल्पात १८ जुलै २०१२ ला झालेल्या हिंसाचारात कंपनीतील अधिकार्याचा जळून मृत्यू झाला होता तर अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर बराच काळ या प्रकल्पातील उत्पादन ठप्प झाल्याने कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कंपनीने कर्मचार्यांच्या पगारात ४९.२५ टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली असून ही कंपनीच्या इतिहासातील पहिलीच मोठी पगारवाढ आहे. अर्थात ही पगारवाढ फक्त गुरगांव आणि मणेसर प्रकल्पापुरतीच मर्यादित आहे. या नव्या करारानुसार कर्मचार्यांच्या पगारात १४ हजार ते २२ हजार रूपयांची वाढ होणार आहे.
हिंसाचारानंतर कंपनी बंद राहिल्याने दर दिवशी कंपनीला ८० कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. या काळात कंपनीचा नफा २२.८४ टक्कयांनी घटला असल्याचे मारूती सुझुकीचे प्रमुख ऑपरेटिंग अधिकारी एस.वाय. सिद्दीकी यांनी सांगितले. ते म्हणाले की कर्मचारी संघटनेशी वेतनवाढीचा तीन वर्षाचा करार करण्यात आला असून हा करार एप्रिलपासूनच लागू केला जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात कर्मचार्यांना वाढीव वेतनाच्या ८० टक्के रक्कम दिली जाणार आहे तर उर्वरित रक्कम पुढील दोन वर्षात दिली जाणार आहे.
कामगार नेत्यांनीही या कराराबाबत समाधान व्यक्त केले असून ज्युनिअर लेव्हलच्या कर्मचार्यालाही या करारामुळे महिना १५ हजार रू. जादा वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर संवादातून कोणताही प्रश्न सोडविता येतो याचाच हा नमुना असल्याचेही या नेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या चार महिन्यात ४० बैठका झाल्या असल्याचे समजते. वेतनवाढीबरोबरच कर्मचार्यांना दरमहा १२०० प्रवास भत्ता देण्यात येणार असून मेडिकल अलौन्सही देण्यात येणार आहे. कर्मचार्यांच्या पालकांसाठी ते स्वतंत्र राहात असले तरी १ लाखांपर्यंत वैद्यकीय मदत गरजेनुसार दिली जाणार असल्याचेही कामगार नेत्यांनी सांगितले.