जाहिरातींवर किती खर्च झाला हे सांगणारे अॅप

वॉशिग्टन दि.२६- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आता रंगात आली आहे. मात्र त्याचवेळी टिव्हीवर उमेदवारांच्या केल्या जात असलेल्या जाहिरातींचा खर्च किती असेल आणि हा खर्च कोण करते याविषयीही मतदारांना उत्सुकता वाटते आहे. ही माहिती खात्रीपूर्वक आणि घरबसल्या मिळवून देणारे सुपर पीएसी अॅप विकसित करण्यात आले असून ते आयफोन अॅप्लीकेशन आहे. याचा वापर करून युजर राजकीय जाहिरातींविषयी सर्व माहिती मिळवू शकणार आहे.

युजरला यासाठी इतकेच करायचे आहे की टिव्हीवर जाहिरात सुरू झाली की त्याचा हे अॅप असलेला फोन त्याने टिव्हीसमोर धरायचा आहे. सुपर पीएसी अमेरिकेतील राजकीय कृती समिती असून ती स्वतंत्रपणे काम करते. मात्र कोणत्याही उमेवारासाठी अमर्याद फंड गोळा करण्याचा तसेच तो खर्च करण्याचा या समितीला अधिकार आहे. त्यांना उमेवाराला प्रचारासाठी असलेल्या खर्च मर्यादेचे बंधन नाही. आयफोनमधील या अॅपमध्ये ऑडिओ रेकगनायझेशन टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे व त्यासाठी ट्यून सॅट नावाची यंत्रणा बसविण्यात आली आहे. फोन जाहिरात सुरू असताना टिव्ही समोर चालू स्थितीत धरला की १२ सेकंदात जाहिरातीतील आवाज ओळखून जाहिरातीच्या प्रायोजकाची माहिती मिळते तसेच संबंधित संस्थेने किती फंड गोळा केला व किती खर्च केला याचीही माहिती युजरला उपलब्ध होते.

निवडणूक खर्चात पारदर्शकता असावी आणि मतदाराना आवश्यकता वाटल्यास त्यासंबंधी खात्रीशीर माहिती मिळावी यासाठी हे अॅप विकसित केले असल्याचे डॅन सिगेल व जेनिफर हॉलेट यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment