उ.कोरियाने चीनला विकले २००० किलो सोने

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या उत्तर कोरियाने देशातील दोन हजार किलो सोने चीनला विकले असून हा व्यवहार अत्यंत गुप्तपणे पार पाडण्यात आला असल्याचे वृत्त आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किमत अंदाजे १० कोटी डॉलर्स इतकी आहे. एका कोरियन उद्योगपतीने केलेल्या आरोपानुसार चीनने कोरियातील सामान्य नागरिकांकडचे किडुकमिडुक सोनेही विकत घेतले आहे.

गतवर्षी किम जाँग यांचा मृत्यू झाल्यानंतर कोरियाची सूत्रे जाँग उन यांनी हाती घेतली. त्यांनी देशाचे संस्थापक किम संग यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अक्षरशः लाखो डॉलर्सची उधळपट्टी करून शताब्दीनिमित्त कार्यक्रम साजरे केले. हा कार्यक्रम एप्रिलमध्ये साजरा करण्यात आला. त्याचबरोबर उत्तर कोरियाने अंतराळ रॉकेट आणि दीर्घपल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसाठीही पैसा खर्च केल्याने देश आर्थिक दिवाळखोरीत गेला. २०१० साली झालेल्या हिसाचारापासून दक्षिण व उत्तर कोरियातील आर्थिक संबंध संपुष्टात आल्याने उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यातच वारेमाप खर्चामुळे देशावर दिवाळखोरीचे संकट आले असल्याचे देशातील तज्ञांचे मत आहे.

उत्तर कोरियात सोन्याच्या खाणी असून या खाणीतून प्रतिवर्षी दोन टन सोन्याचे उत्पादन होते असेही समजते. यामुळेच सरकारने कर्ज काढण्यापेक्षा सोने विक्रीलाच प्राधान्य देऊन आर्थिक संकटातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला असावा असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment