राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे चातुर्यपूर्ण राजकीय खेळी करण्यात वाकबगार समजले जातात. परंतु काल त्यांच्याही वर मात करीत त्यांच्या पुतण्याने आपण सुद्धा सुपर राजकीय खेळी करू शकतो हे दाखवून दिले. एका परीने अजित पवार यांनी जुगार खेळण्याची जोखीम पत्करलेली आहे. परंतु राजकारणात किवा उद्योगात जो जोखीम पत्करतो तोच पुढे जातो. अजित पवार यांनी अशा प्रकारचा राजीनामा देऊन काही प्रमाणात शरद पवार यांच्यावर सुद्धा मात केलेली आहे. अजित पवार यांनी काल अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. ही घटना एवढी अनपेक्षित होती की, सुरुवातीचे काही तास नेमके हे काय चाललेले आहे याचा अंदाज कोणालाच आला नाही. महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीही घडले तरी ती शरद पवार यांचीच खेळी असणार असे विश्लेषण करणारे काही ठोकळेबाज राजकीय निरीक्षक या देशामध्ये आहेत आणि ते नेहमीप्रमाणेच यात शरद पवार यांनी काय डाव टाकला असेल याचेच विश्लेषण करत बसले होते.
अजित दादांची खेळी
परंतु खेळी करणे आणि डाव टाकणे यामध्ये आपण आपल्या काकांपेक्षा सुद्धा काकणभर सरस आहोत असे दाखवून देत अजित पवार यांनी ही धाडसी खेळी केलेली आहे. ही शरद पवार यांची खेळी नसून पूर्णपणे अजित पवार यांचीच खेळी आहे आणि तिला अलीकडच्या राजकारणात तरी तोड नाही. अजित पवार यांचा सातत्याने होणार्या आरोपातून बाहेर पडण्यासाठीचा आणि आपले नैतिक वजन वाढविण्या साठीचा चातुर्याने टाकलेला हा डाव आहे. विरोधी पक्षांनी याची संभावना नाटक अशा शब्दात केली असली तरी प्रत्यक्षात ते नाटक नाही.
साधारणपणे काँग्रेसचे नेते, मग ते राष्ट्रवादीचे का असेनात ते असे राजीनामे देत नसतात. कारण त्यांच्यासाठी सत्ता हेच जगण्याचे साधन असते. वाट्टेल त्या बारा भानगडी करा, पण हातातली सत्ता सहजासहजी सोडू नका हा त्यांचा बाणा असतो. त्यामुळे अजित पवार यांनी राजीनामा देणे ते त्यांच्या पक्षाच्या मूळ स्वभावाशी विसंगत आहे. आपण त्यांच्या पक्षातच आता असे काही लोक बघत आहोत की, जे गंभीर आरोप होऊन सुद्धा राजीनामा देत नाहीत. छगन भुजबळ यांच्यावर तर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि त्यांच्यावरील या आरोपांचे पुरावे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सादर केलेले आहेत.
असे असून सुद्धा पदाचा राजीनामा देऊन चौकशीला समोर जाण्याची हिंमत भुजबळ दाखवत नाहीत. तटकरेंचे प्रकरण तर ताजेच आहे. त्यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत पण ते खुर्चीला चिटकून बसले आहेत. गुलाबराव देवकर हे एक राष्ट्रवादीचे नेते आहेत. ते ज्या प्रकरणात आरोपी आहेत त्या प्रकरणात सुरेश जैन हे आता गजाआड पडलेले आहेत. देवकर यांनाही कधी अटक होईल याचा नेम नाही. मात्र अशा प्रकरणातल्या आरोपींना जामीन देण्याच्या संबंधात उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींचा कमाल वापर करत ते आता केवळ बाहेर राहिलेले आहेत. प्रत्यक्षात त्यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत. पण ते सुद्धा राजीनामा देण्याचे नाव काढत नाहीत. काँग्रेसचे नेते राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्यावर कोळसा भ्रष्टाचारात आरोप झाले तेव्हा, मोठ्या तडफदारपणे, आरोप खरे असतील तर राजीनामा फेकेन अशी वल्गना केली. परंतु दुसर्या बाजूला पक्षश्रेष्ठींनी आपला राजीनामा मागू नये यासाठी त्यांनी जीवापाड प्रयत्न केलेला आहे.
एकंदरीत आरोप कितीही गंभीर असले तरी शेवटच्या क्षणापर्यंत हातातली सत्ता सोडायची नाही, अशी या लोकांची प्रवृत्ती आहे. अजित पवार यांनी मात्र वेगळ्या प्रवृत्तीचे दर्शन घडवले आहे.
आपल्यावर सातत्याने आरोप होत आहेत आणि आपण त्याला काहीच उत्तर देत नाही. तेव्हा त्यामुळे आपल्यावरचे आरोप खरेच आहेत असा लोकांचा समज होतो. त्यामुळे श्री. विजय पांढरे यांनी अजित पवार यांना गुंतवणारे आरोप केले तेव्हा पवार व्यथित झाले आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी दिलेला राजीनामा सातत्याने आरोप होत असल्यामुळे वैतागून दिलेला राजीनामा नाही किंवा आपल्या जलसंपदा मंत्रिपदाच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून दिलेला तो मूल्याधारित राजीनामाही नाही. आपली स्वतःची प्रतिमा स्वच्छ करून घेण्यासाठी त्यांनी मोठ्या धाडसाने हा राजीनामा दिलेला आहे.
राजीनामा देताना त्यांनी कसल्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवली आहे. अशी चौकशी होत असताना आपण सत्तेवर राहिलो तर चौकशी करणार्यावर आपला दबाव आला असा आरोप होऊ शकतो, म्हणून आपण कोणतीही चौकशी होत असताना सत्तेवर राहणार नाही असे म्हणत त्यांनी सत्ता सोडली आहे. आपली चौकशी झाल्यास आपण पूर्णपणे निर्दोष ठरणार आहोत अशी त्यांना खात्री आहे आणि तसे निर्दोष ठरेपर्यंत आपण मंत्रिपदापासून दूर राहू, असाही निर्धार त्यांनी केला आहे. त्यांचा हा राजीनामा खरोखर स्वागतार्ह आहे.