केजरीवालांच्या पक्षाची स्थापना गांधी जयंतीला

नवी दिल्ली: सध्याच्या राजकीय पक्षांना समर्थ राजकीय पर्याय उभा करण्याच्या दृष्टीने महात्मा गांधींच्या जयंती दिवशी २ ऑक्टोबर रोजी आपल्या नवीन पक्षाची स्थापना केली जाईल; अशी घोषणा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी केली. सत्ता, सामर्थ्य आणि संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने आपण राजकारणात पदार्पण करीत नसून भ्रष्टाचार चळवळीला बळ देण्याच्या उद्देशाने राजकारण करणार आहोत; असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय पक्षाच्या स्थापनेपासून दूर राहून आपला आंदोलनाचा मार्ग स्वतंत्रपणे चोखाळण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केल्यानंतरही पक्ष स्थापनेचा केजरीवाल यांचा निर्णय कायम आहे.

आम्ही स्वखुशीने किंवा हौस म्हणून राजकारणात येत नाही; तर विद्यमान राजकीय व्यवस्थेने आम्हाला राजकारणात येण्यास भाग पाडले आहे; हे केजरीवाल यांनी पुन्हा स्पष्ट केले. कोणत्याही पक्षाच्या केंद्र शासनाने लोकपाल विधेयक, ग्रामसभेला अधिक अधिकार, निवडणुकीत उमेदवार नाकारण्याचा अधिकार आणि निवडून गेलेल्या उमेदवाराला परत बोलाविण्याचा अधिकार; हे कायदे संमत केले तर आम्हाला पक्ष स्थापन करण्याची आवश्यकताच नाही; असे त्यांनी सांगितले.

जोपर्यंत पक्षाची स्थापना होत नाही; तोपर्यंत कोणत्याही स्वरूपात देणग्या स्वीकारणार नसल्याचेही केजरीवाल यांनी जाहीर केले.