आई वडील शब्दावर फ्रान्समध्ये बंदी

समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्यानंतर आता फ्रान्स सरकार सर्व अधिकृत कागदपत्रांतून फादर, मदर हे शब्द वापरण्यावर बंदी आणण्याचा विचार करत असून त्याऐवजी पालक म्हणजेच पॅरेंटस असा शब्द वापरणे बंधनकारक करणार आहे. इतकेच नव्हे तर विवाहासंबंधीच्या ड्राफ्टमध्येही बदल करण्यात येत असल्याचे समजते. विवाह म्हणजे दोन लोकांचे एकत्र येणे अशी व्याख्या केली जाणार आहे. त्यामुळे हे दोन लोक समलिंगीही असू शकतात अथवा भिन्नलिंगीही असू शकतात. याच कायद्यानुसार दोन्ही प्रकारच्या विवाहात दत्तक घेण्याचे समान हक्कही दिले जाणार आहेत.

फ्रेंच कॅथॉलिक चर्च प्रमुख कार्डिअल फिलीप बार्बारीन यांनी मात्र गेल्याच आठवड्यात गे मॅरेजमुळे समाजात बहुपत्नीकत्व आणि दुराचारासारख्या अनेक समस्या निर्माण होतील असा इशारा दिला आहे. त्यांच्या मते विवाह म्हणजे दोन जणांचे एकत्र येणे ही व्याख्याही कांही काळाने बदलली जाईल आणि तीन चार जणांनी एकत्र राहण्यालाही विवाह म्हटले जाईल. त्यातूनच कदाचित मातागमनासारखे पातक घडण्याची शक्यता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रमुख फ्रेंच कॅथॉलिकांनी एक प्रेअर नुकतीच प्रसिद्ध केली असून त्यानुसार प्रौंढांच्या इच्छा आणि त्यांच्या आकांक्षा मुलांवर लादल्या जाऊ नयेत, अन्यथा त्यांना आई वडिलांच्या प्रेमाचा लाभ घेता येणार नाही असे म्हटले गेले आहे.

Leave a Comment