पालीचा बल्लाळेश्वर

अष्टविनायकांपैकी भाविकाच्या नावावरून प्रसिद्ध असलेला हा एकमेव गणपती असून तो ब्राह्मणवेषात आहे. सारसगड आणि अंबा नदी यांच्यामध्ये असलेले हे पाली गांव रायगड जिल्ह्यात असून पुणे मुंबई महामार्गावर असलेल्या नागोठणे येथून ११ किमीवर आहे. येथे बल्लाळ नावाचा एक मुलगा गणपतीची आराधना करत होता मात्र त्याच्या वडीलांना त्याची ही भक्ती आवडत नसे आणि ते त्याला मारहाण करत असत. ज्या धुंडीविनायकाची बल्लाळ पूजा करत असे ती मूर्ती वडिलांनी रागाने फेकून दिली. मात्र त्यातून प्रत्यक्ष गणपती प्रकट झाला अशी ही कथा. pali-ballaleshwar.jpg1
मूळ मंदिर लाकडात बांधलेले होते. त्याचा जीर्णोद्धार पेशव्यांचे फडणीस नाना फडणवीस यांनी १७६० साली केला. मंदिराजवळ दोन तळी असून त्यातील उजव्या तळ्यातील पाणी पूजेसाठी वापरले जाते. पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर देवनागरीतील श्री या आकारात उभारले गेले आहे. दक्षिणायन सुरू झाले की सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे या मूर्तीवर पडतात. मंदिराला दोन सभामंडप असून बाहेरच्या सभामंडपात असलेली मूषक मूर्ती पुढच्या दोन पंजात मोदक पकडलेली आहे. आतील सभामंडपात बल्लाळेश्वराची तीन फूट उंचीची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. त्याच्या डोळ्यात आणि नाभीत हिरे बसविले गेले आहेत. रिद्धी सिद्धीच्या मूर्ती दोन बाजूंना आहेत. या मंदिरामागे मूळ धुंडीविनायक असून ही  स्वयंभू मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. प्रथम याचे दर्शन घेऊन मगच बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्याची प्रथा आहे
pali-ballaleshwar
बल्लाळेश्वर ज्या सिंहासनावर विराजमान आहे, ते सिंहासन सायप्रस वृक्षाशी साम्य असलेले असून मंदिराचे आठ खांब अष्टदिशांचे दर्शक आहेत. मंदिराचे दगडी बांधकाम शिसे वापरून केले गेले आहे. या देवतेचे वैशिष्ठ म्हणजे गणपतीचा नैवेद्य मोदक असले तरी या गणपतीला बेसन लाडवांचाच नैवेद्य दाखविला जातो.

Leave a Comment