मुंबई दि.२४- तेल वितरण कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे भाव कमी झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रूपया वधारल्याने भारतात पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. तेल मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार इंडियन बास्केट क्रूडची किंमत ११९ डॉलर्सवरून पाच दिवसांपूर्वी १०६.४७ डॉलर्सवर घसरली आहे.
सरकारने जो सुधारणावादी कार्यक्रम राबविला आहे त्याचा हा परिपाक आहे. सर्वसाधारणपणे क्रूड तेलाचे दर १ डॉलरने उतरले तर पेट्रोलची किमत ३३ पैशांनी उतरते. त्यात रूपया आता वधारला असल्याने या हिशोबाने पेट्रोलचे दर किमान ७५ पैशांनी उतरायला हवेत. मात्र त्यासाठी आणखी कांही काळ प्रतीक्षा करावी लागेल असे भारत पेट्रोलियमचे संचालक एस. वरदराजन यांनी सांगितले. ते म्हणाले की सध्या इंधन वितरण कंपन्या ना नफा ना तोटा या धर्तीवर पेट्रोल विकत आहेत.
तेल वितरण कंपन्या यापूर्वी प्रत्येक महिन्याच्या १ व १६ तारखेला सरासरी आंतरराष्ट्रीय दर व परकीय चलन विनिमय दर लक्षात घेऊन देशातील तेलाच्या किमती निश्चित करत असत व तशा जाहीर करत असत. अलिकडे ही पद्धत बंद करण्यात आली आहे. अमेरिकेत दररोज दुपारी तीन वाजता तेलाचे दर जाहीर केले जातात तर अन्य अनेक देशात तासातासाला असे दर जाहीर केले जातात. भारतात आठवड्यातून एकदा तरी ही पद्धत सुरू करण्याची गरज असून त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकावर दरवाढीचा बोजा एकदम पडत नाही असे तज्ञांचे मत आहे.
भारत पेट्रोलियमचे अध्यक्ष आर.के. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार तेल वितरकांवर असलेली नियंत्रणे सरकारने २०१० मध्ये मागे घेतली असली तरी इंधन वितरण कंपन्यांना दर रिव्हाईज करायची परवानगी अद्यापी नाही. सरकारने आदेश काढल्यानंतरही दरवाढ अथवा दरकपात केली जाते आणि ती ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत आणखी कांही काळ जातो.