जिल्हा बँका वाचविण्यासाठी अर्थमंत्र्यांना साकडे

नवी दिल्ली: राज्यातील सहा मध्यवर्ती सहकारी बँकाना जीवदान मिळावे यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली. या प्रकरणाचा सकारात्मक दृष्टीने विचार करून बँका वाचविण्याच्या दृष्टीने केंद्र शासन आवश्यक ते सहकार्य करेल; अशी ग्वाही चिदंबरम यांनी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील नागपूर, वर्धा, बुलडाणा, जालना, धुळे, नंदुरबार आणि उस्मानाबाद या बँका अडचणीत आल्याने रिझर्व बँकेने त्यांना आर्थिक कारभार सुधारण्याची तंबी दिली आहे. अन्यथा त्यांचे परवाने काढून घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या बँकाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असून राज्य आपल्या खजिन्यातून तेवढी मदत करू शकत नसल्याची परिस्थिती आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडे घातले.

अशाच प्रकारे उत्तरप्रदेशातील ३१ बँकांसह देशातील एकूण ४२ बँका अडचणीत असून त्या सगळ्यांबाबत मार्ग काढण्यासाठी काही कालावधी जावा लागेल. मात्र या बाबत सकारात्मक पावले उचलण्याचे काम केंद्र शासन करेल; असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment