कसाबचा दयेचा अर्ज राज्य गृहविभागानेच ठरविला रद्दबातल

मुंबई: मुंबई वरील २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची दया याचना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या गृह विभागाने रद्दबातल ठरविली आहे. त्यामुळे कसाबच्या फाशी टाळण्याची अखेरची अशाही संपुष्टात आली आहे.

महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कसाबचा दयेचा अर्ज मुख्यमंत्री कार्यालयातून आवश्यक त्या शिफारशीनुसार पुढे केंद्रीय गृह विभागामार्फत राष्ट्रपती भवनात जाणे प्रक्रियेनुसार अपेक्षित होते. मात्र गृहमंत्रालयाने हा अर्ज मुख्यमंत्री कार्यालयातच रद्दबातल करून पाठविला आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयातून राष्ट्रपती भवनात तो नकारात्मक शिफारस घेऊन पाठविला जाईल. त्यानंतर राष्ट्रपती पुनर्विचारासाठी तो पुन्हा राज्य सरकारकडे पाठवू शकतात. मात्र कसाबच्या गुन्ह्याचे स्वरूप पाहता ती शक्यता अगदीच नगण्य आहे; असा दावा सूत्रांनी केला.

कसाबच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झाल्यापासून राजकीय पक्षांबरोबरच सामान्य नागरिक आणि विशेषत: मुंबईकरांकडून कसाबला लवकरात लवकर फासावर चढविण्याची मागणी केली जात आहे. कल्याण येथे राहणारे एक नागरिक नारायण पाटील हे तर कसाबला फाशी द्या; अशी मागणी करणारे दररोज एक पत्र राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालयाला पाठवीत आहेत.

Leave a Comment