उडती तबकडी कॅमेर्‍यात टिपली

मेलबोर्न दि.२४- ऑस्ट्रेलियाच्या कांही भागात व विशेषतः मेलबर्न शहरात उडत्या तबकड्या दिसल्याच्या वार्ता आणि दावे वेळोवेळी केले जातात. मात्र शहराच्या क्षितीजरेषेवर दिसत असलेल्या आणि सुमारे दीड तास कार्लटन गार्डन परिसरावर रेंगाळलेल्या उडत्या तबकडीचे चित्रण आपल्या मोबाईल कॅमर्‍यात टिपल्याचा दावा टॉड नावाच्या व्यक्तीने केला आहे. ही चित्रफित तीन मिनिटांची आहे.

टॉड सांगतो कार्लटन गार्डन परिसरात रात्री साडेनऊवाजता त्याने प्रथम ही तबकडी पाहिली. अन्य कांही नागरिकांनी ती सायंकाळच्या वेळी पाहिल्याचे सांगितले. कार्लटन गार्डनवर ही तबकडी रात्री ११ वाजेपर्यंत तरंगत होती नंतर ती इमिग्रेशन म्युझियमच्या दिशेने गेली. टॉडच्या मते सध्या आकाशात उडणारी जेवढी विमाने आहेत त्यांच्याशी या तबकडीचे कुठेच साम्य नव्हते. या तबकडीतून आकाशात विविध रंगाचे लाईट सोडले जात होते आणि हे लाईट विशिष्ठ फॉर्मेशनमध्ये होते व थोड्या थोड्या वेळाने ही फॉरर्मेशन बदलत होती. टॉड जेव्हा कार्लटन गार्डनपाशी पोहोचला तेव्हा अनेक नागरिक हे दृष्य पाहात होते.

अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ व्हिक्टोरियाचे प्रवक्ते पेरी यांनी मात्र ही तबकडी जर इतका वेळ आकाशात दिसत होती, तर खगोलप्रेमी आणि आकाशनिरीक्षकांनी ती कशी पाहिली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले प्रत्येक निरभ्र रात्री खगोलतज्ञ आणि हौशी आकाश निरीक्षक देशाच्या विविध भागातून अत्यंत चांगल्या दुर्बिणीतून आकाश निरीक्षण करत असतात आणि त्यांच्या सोसायटीचे असे शेकडो सदस्य आहेत. त्यात मेलबर्नमध्येही अनेक सदस्य आहेत. मात्र त्यांच्यापैकी कुणाकडूनही अद्याप अशी कांही वस्तू पाहिल्याची माहिती आलेली नाही.

कार्लटन गार्डन परिसरातच राहणार्‍या पेनी सोया या महिलेने मात्र तिच्या घराच्या बाल्कनीतून आठ केशरी रंगाचे प्रकाशझोत क्षितिजावर पाहिल्याचे आणि क्षणाक्षणाला हे रंग बदलत असल्याचे व वेगवेगळे आकार धारण करत असल्याचे सांगितले आहे. तर पश्चिम उपनगरातील एका नागरिकाने वेगाने उडणार्‍या बशीसारख्या वस्तूचे आठ मिनिटांचे व्हिडीओकरण केले असल्याचे सांगितले आहे. त्याच्या सांगण्याप्रमाणे ही वस्तू दीड तास आकाशात रेंगाळत होती.

Leave a Comment