इस्त्रायल जगावर लादतेय तिसरे महायुद्ध: इराण

तेहरान: इस्त्रायल इराणवर आक्रमण करण्याचे मनसुबे रचून तिसर्‍या जागतिक महायुद्धाची बीजे रोवत असल्याचा आरोप इराणचे आयआरजीसी एरोस्पेस विभागाचे प्रमुख ब्रिगेडीयर जनरल अमीर अली हाजीजेदाह यांनी केला. इस्त्रायलने इराणवर युद्ध लादल्यास इस्त्रायलला तर आम्ही धूळ चारुच; याशिवाय अमेरिकी लष्कराचे तळ असणार्‍या देशांवरही हल्ले करू; असा इशाराही त्यांनी दिला.

इराणच्या अणु कार्यक्रमामुळे पाश्चिमात्य देश; विशेषत: इस्त्रायलचा रोष ओढविला असून इस्त्रायलशी संघर्षाची ठिणगी केव्हाही पडू शकते; अशी शक्यता ब्रिगेडियर जनरल हाजीजेदाह यांनी व्यक्त केली. इस्त्रायलने आमच्याशी युद्ध करण्याचे धाडस दाखविले तर काही दिवसातच आम्ही इस्त्रायलला धुळीस मिळवू; असा इशाराही त्यांनी दिला.

इस्त्रायल आणि इराण यांचे संबंध कायमच ताणलेले राहिले आहेत. इराणच्या अणु कार्यक्रमामुळे अमेरिकेसारखी राष्ट्रही इराणच्या विरोधात उभी ठाकली आहेत. इराणचा अणु कार्यक्रम शांततापूर्ण आणि प्रामुख्याने देशाची उर्जेची गरज भागविण्यासाठी असल्याचा खुलासा इराणने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून केला असला तरी पाश्चिमात्य देशांचा त्यावर विश्वास नाही.

Leave a Comment