भारतामध्ये बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणल्या जात आहेत. या प्रश्नाचे नेमके गांभीर्य किती याचा अंदाज सामान्य माणसाला कळत नाही. पण नोटा येतात एवढेच कळते. या संबंधात एका कार्यकर्त्यानं माहितीच्या अधिकाराखाली रिझर्व्ह बँकेकडे माहिती मागितली असता बँकेने जी माहिती दिली ती आपल्याला चक्रावून टाकणारी आहे. गेल्या तीन वर्षात चलनात नकली नोटा आणण्याचे प्रमाण वरचेवर वाढत आहे. २००९-१० या आर्थिक वर्षात या देशात १५ कोटी रुपये किमतीच्या नोटा चलनात आढळल्या. त्यानंतरच्या वर्षी ही किमत १९ कोटी झाली आणि गेल्या वर्षी ही किमत २४ कोटी रुपये झाली. हे आकडे काही पूर्ण नाहीत. चलनातल्या सापडलेल्या बनावट नोटा सापडल्यानंतर ज्या नोटा बँकेत पकडल्या गेल्या आणि रिझर्व्ह बँकेकडे गेल्या त्यांची ही किंमत आणि आकडेवारी आहे. अनेक बँकांत बनावट नोट सापडली की ती लगेच जाळून टाकली जाते. अशा नोटांची एकूण किंमत किती याचा आकडा कधीच मिळत नाही. त्यामुळे तो किती तरी मोठा असण्याची शक्यता आहे. कोणालाही न सापडता बाजारात फिरत असलेल्या नोटा अजून वेगळ्याच आहेत.
आपल्या व्यवहारात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. काही बँका आणि हॉटेलांमध्ये दररोज एक दोन तरी बनावट नोटा चलनात आलेल्या दिसतात. सीबीआयने बनावट नोटांचे हे कारस्थान कसे रचले जाते आणि हा पैसा कोठून कसा कसा येतो याचा छडा लावला तेव्हा या बनावट नोटांच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. पाकिस्तानचा हात याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिमसारखे देशद्रोही लोक अशा नोटा छापतात आणि पाकिस्तान सरकार अशा लोकांकडे जाणूनबुजून दुलर्क्ष करते. हा या प्रकरणामागे हात असण्याचा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे अशा नोटा छापणार्यांना मदत करणे. परंतु पाकिस्तानचा हात या प्रकरणात त्यापेक्षाही थेट आहे. भारतात चलनात येणार्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा पाकिस्तानचे सरकारच छापत आहे. इतका पाकिस्तानचा हिस्सा थेट आणि प्रक्षोभक आहे. भारताच्या गुप्तचरांनी या गोष्टीचा छडा लावला असून या बनावट नोटांसाठी वापरला जाणारा कागद आणि त्या कागदावर होणारी विशिष्ट प्रकारची छपाई ही सरकारी सिक्युरिटी प्रेसशिवाय अन्यत्र कोठेही होऊ शकत नसते, हे दाखवून दिलेले आहे.
जगभरामध्ये चलनी नोटा छापण्याची यंत्रसामुग्री किवा छापखाने उत्पादित करणार्या बड्या उद्योगांनी असे छापखाने केवळ सरकारलाच विकलेले आहेत. कोणत्याही गँगस्टरना किवा दहशतवाद्यांना ही यंत्रे विकली जात नसतात आणि बनावट नोटा ज्या प्रकारे छापलेल्या आहेत त्या प्रकाराचा मागोवा घेतला असता त्या पाकिस्तानच्या सिक्युरिटी प्रेसमध्येच छापल्या असल्याचे उघड झाले आहे. या गोष्टीचे पुरावे या गुप्तचरांनी पाकिस्तान सरकारला दिलेले सुद्धा आहेत. परंतु पाकिस्तानच्या या पाताळयंत्री पणाला अजून तरी अटकाव झालेला नाही. भारताच्या आर्थिक चलनामध्ये १६ हजार कोटी रुपयांचे बनावट चलन असल्याचे सीबीआयचे मत आहे. या नोटांचा छडा लावणे आणि त्या चलनात आणणार्या टोळ्या उद्ध्वस्त करणे यासाठी सीबीआयने महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाची मदत घेतली. तेव्हा या पथकाने खूपच कसून तपास केला. या तपासात असे आढळले आहे की, भारतात चलनात येणार्या बनावट चलनापैकी ३० टक्के चलन एकट्या महाराष्ट्रात व्यवहारात आणले जाते. महाराष्ट्र हे या बेकायदा व्यवहारात गुंतलेल्या टोळ्यांच्या रडारवर प्रमुख राज्य म्हणून कसे समाविष्ट केलेले आहे हे यावरून लक्षात येते.
हे कारस्थान उधळून लावण्यासाठी गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस कार्यरत आहेत. परंतु हे प्रकार कमी होण्याऐवजी वाढत चाललेले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या एका माहितीनुसार महाराष्ट्रात बनावट चलनाच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या सहा वर्षात सातपट वाढ झालेली आहे. या नोटा पाकिस्तानात छापल्या जातात आणि भारतात पाठवल्या जातात. या कारस्थानामागे दोन हेतू आहेत. पहिला हेतू आहे भारताची अर्थव्यवस्था विस्कळीत करणे आणि दुसरा आहे भारतात कार्यरत असलेल्या पाकिस्तानवादी दहशतवाद्यांना आर्थिक मदत देणे. पाकिस्तानात ज्या ठिकाणी या नोटा छापल्या जातात तिथे त्या नोटा १०० रुपयाला २६ रुपये या दराने काही एजंटांना विकल्या जातात. साधारण २६ टक्के किंमत देऊन या नोटा विकत घेणारा एजंट त्या नोटा आणखी थोडी जास्त किंमत देऊन आय.एस.आय. समर्थित दहशतवादी संघटनेला विकतो. या दहशतवादी संघटनांचे हस्तक त्या नोटा नेपाळ आणि बांगला देशमध्ये पाठवतात. या नोटांचा व्यापार करण्यासाठी पश्चिम बंगालमधील माल्दा आणि पुरुलिया हे दोन जिल्हे प्रसिद्ध आहेत. तिथे काही एजंट ही नोट २६ टक्के रकमेला घेतात आणि बाजारात चलनात आणतात. या साखळीतल्या दहशतवाद्याला खरी नोट मिळते आणि बनावट नोट सामान्य ग्राहकाच्या माथी मारली जाते.